चंपाई सोरेन झारखंडचे नवे मुख्यमंत्री; हेमंत सोरेन यांचा राजीनामा: ईडीकडून कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

आज (31 जानेवारी) हेमंत सोरेन यांच्या निवासस्थानी झामुमोच्या आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीत चंपाई यांची...
चंपाई सोरेन झारखंडचे नवे मुख्यमंत्री; हेमंत सोरेन यांचा राजीनामा: ईडीकडून कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

झारखंडच्या राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला असून त्यांना कोणत्याही क्षणी ईडीकडून अटक होण्याची शक्यता आहे. त्यांच्याजागी झारखंड मुक्ती मोर्चाचे चंपाई सोरेन यांची झारखंडच्या मुख्यमंत्रीपदी वर्णी लागणार आहे. आज (31 जानेवारी) हेमंत सोरेन यांच्या निवासस्थानी झामुमोच्या आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीत चंपाई यांची झामुमोच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. चंपाई सोरेन हे हेमंत सोरेन यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात. 

"आम्ही चंपाई सोरेन यांची विधीमंडळ पक्षनेते म्हणून निवड केली आहे. राज्यपालांना शपथविधीसाठी विनंती करण्यासाठी आम्ही राजभवनात आलो होतो." असे झारखंडचे मंत्री बन्ना गुप्ता यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. तसेच, सत्ताधारी आघाडीच्या आमदारांना घेऊन जाणाऱ्या दोन गाड्या राजभवनात दाखल झाल्या आहेत. झामुमोचे प्रमुख हेमंत सोरेन यांनी चंपाईंच्या पाठिंब्याच्या पत्रावर त्यांच्या पक्षाच्या आमदारांच्या सह्या घेतल्या असून हे पत्र झारखंडच्या राज्यपालांना सादर करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

झामुमोच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी आघाडीला 81 आमदारांपैकी 49 आमदारांचा पाठिंबा आहे. यात झामुमोचे 29, काँग्रेसचे पक्षाचे16, एनसीपी, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सिस्ट-लेनिनिस्ट) लिबरेशन आणि राष्ट्रीय जनता दलाच्या प्रत्येकी एक आणि इतर एका आमदाराचा समावेश आहे.

दरम्यान, आज झारखंडच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. एका कथित जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात हेमंत सोरेन यांची ईडीचौकशी केली जात आहे. सोरेन यांची गेल्या 11 दिवसांत दुसऱ्यांदा चौकशी सुरु आहे. तसेच, त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

logo
marathi.freepressjournal.in