रांची : ईडीने कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात बुधवारी हेमंत सोरेन यांची रांचीतील त्यांच्या सरकारी निवासस्थानी चौकशी सुरू केली. दिवसभारात सात तास त्यांची चौकशी झाली. केंद्र सरकारच्या डावपेचांना प्रत्युत्तर देण्यासाठी सोरेन यांनी ईडीविरुद्ध 'एससी/एसटी कायद्याच्या अंतर्गत एफआयआर दाखल केला. सोरेन यांच्या अटकेची शक्यता वाढल्याने त्यांच्या निवासस्थानाजवळ बुधवारी सकाळपासूनच झारखंड मुक्ती मोर्चाच्या (जेएमएम) कार्यकर्त्यांची गर्दी जमू लागली. त्यामुळे रांची शहरात जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला. हे सर्व नाट्य सुरू असतानाच बुधवारी सायंकाळी राज्याचे मुख्य सचिव एल. खियांगटे आणि पोलीस महासंचालक अजय कुमार सिंग मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात हजर झाल्याने सोरेन यांच्या अटकेची शक्यता गडद झाली होती.
दरम्यान, हेमंत सोरेन यांना पर्याय म्हणून मुख्यमंत्रीपदाचा नवीन उमेदवार निश्चित करण्याच्या हालचालींना वेग आला. त्यात त्यांच्या पत्नी कल्पना सोरेन यांचे नाव आघाडीवर होते. मात्र, रात्री हेमंत सोरेन ईडीच्या अधिकाऱ्यांसह राजभवनात गेले आणि त्यांनी मुखंयमंत्रीपदाचा राजीनामा दिला. जेएमएमतर्फे मुख्यमंत्रीपदासाठी चंपाई सोरेन यांचे नाव जाहीर करण्यात आले आणि पर्यायाच्या चर्चेवर पडदा पडला. दरम्यान, राज्यपालांनी आमदारांची घेतली असून नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. चंपाई सोरेन यांनी त्यांना ४७ आमदारांचा पाठिंबा असल्याचे म्हणत सरकार स्थापनेचा दावा केला आहे.
हेमंत सोरेन यांच्यावर विविध प्रकरणांत अनेक आरोप करण्यात आले आहेत. त्या संदर्भात चौकशी करण्यासाठी ईडीने त्यांना नऊ वेळा समन्स बजावले होते. पण, सोरेन यांनी त्याला काही प्रतिसाद दिला नाही. ईडीने २९ जानेवारी रोजी सोरेन यांच्या दिल्लीतील निवासस्थानी धाड टाकली असता ३६ लाख रुपयांची रोख रक्कम आणि एसयूव्ही (कार) जप्त करण्यात आली. त्यांचाही आपल्याशी किंवा पक्षाशी काही संबंध नसल्याचा दावा सोरेन यांनी केला. दरम्यान, ईडीकडून होणारी संभाव्य अटक टाळण्यासाठी सोरेन ४० तास बेपत्ता होते. मंगळवारी ते अचानक रांचीत दाखल झाले आणि पक्षाच्या आमदारांची बैठक घेतली. तसेच, बुधवारी आपण ईडीच्या चौकशीला सामोरे जाणार आहोत, असे सांगितले.
त्यानुसार बुधवारी सकाळपासूनच या नाट्याला रंग चढू लागला होता. रात्री उशीरा हेमंत सोरेन यांच्या राजीनामा आणि अटकेनंतर या प्रकरणावर पडदा पडला.
राजकीय वारशाचा तिढा ...
हेमंत सोरेन यांच्या अटकेची शक्यता वाढल्याने त्यांच्या जागी नवीन मुख्यमंत्री निवडण्याच्या राजकीय हालचालींनाही वेग आला. त्यात त्यांच्या पत्नी कल्पना सोरेन यांचे नाव प्रामुख्याने चर्चेत होते. कल्पना सोरेन इंजिनिअरिंगच्या पदवीधारक आणि एमबीए आहेत. त्यांनी गेल्या काही दिवसांत जेएमएम पक्षाच्या कामात अधिक रस घेण्यास सुरुवात केली आहे. पण त्यांना मुख्यमंत्रीमंत्रीपदी नेमण्यात मुख्य अडचण अशी आहे की, त्या सध्या निवडून आलेल्या आमदार नाहीत. मुख्यमंत्री बनल्यानंतर सहा महिन्यांत त्यांना निवडून यावे लागेल. शिवाय त्या मूळच्या ओदिशाच्या रहिवासी असल्याने त्यांना झारखंडमध्ये आदिवासींसाठी आरक्षित मतदारसंघातून निवडणूक लढवता येणार नाही. ही समस्या दूर करण्यासाठी झारखंडच्या गाण्डेय मतदारसंघातील आमदार सरफराज अहमद यांनी अचानक राजीनामा दिला आहे. मात्र, झारखंडमध्ये नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये विधानसभा निवडणूक नियोजित आहे. त्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने गाण्डेय मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्यास नकार दिल्यास कल्पना सोरेन आणखी अडचणीत येऊ शकतात. मात्र, बुधवारी रात्री झारखंड मुक्ती मोर्चाच्या वतीने चंपाई सोरेन यांचे नाव नवीन मुख्यमंत्रीपदासाठी जाहीर करण्यात आल्याने या चर्चेवर पडदा पडला.
हेमंत सोरेन यांच्यावरील आरोप
काळा पैसा चलनात आणणे (मनी लाँड्रिंग)
रांचीतील बरगई भागातील भूखंडाची वादग्रस्त मालकी
खाणकाम खात्याचे प्रमुख असताना स्वत:लाच खाणींचे पट्टे वर्ग करून घेणे
रांचीतील सोहराई भवनच्या मालकीबाबत निवडणूक आयोगाच्या प्रतिज्ञापत्रात चुकीची माहिती भरणे
नऊ वेळा समन्स बजावूनही चौकशीसाठी अनुपस्थित राहणे
दिल्लीतील निवासस्थानी ईडीच्या धाडीत ३६ लाख रुपयांची रोकड आणि एसयूव्ही जप्त
चौकशी टाळण्यासाठी मुख्यमंत्री पदावर असताना ४० तास बेपत्ता राहणे