चंदीगड महापौर निवडणुकीत मोठा उलटफेर; भाजपचा उमेदवार विजयी, आप-काँग्रेसची आठ मते बाद

चंदीगडच्या महापौर निवडणुकीत ज्या पद्धतीने अप्रामाणिकपणा केला गेला आहे, तो अत्यंत चिंताजनक आहे. हे लोक महापौरपदाच्या निवडणुकीत एवढी खालची पातळी गाठू शकतात, तर देशातील निवडणुकीत...
चंदीगड महापौर निवडणुकीत मोठा उलटफेर; भाजपचा उमेदवार विजयी, आप-काँग्रेसची आठ मते बाद

आगामी लोकसभा निवडणुकीआधी इंडिया आघाडीची लिटमस चाचणी समजल्या जाणाऱ्या चंदीगड महापौरपदाच्या निवडणुकीत आम आदमी पक्ष आणि काँग्रेसच्या उमदेवाराचा पराभव झाला आहे. या निवडणुकीत आप आणि काँग्रेसकडे मिळून 20 मते होती. तर भाजप आणि अकाली दलाकडे मिळून 16 मते होती. पण, मतदानानंतर आप-काँग्रेसची आठ मते अवैध ठरवण्यात आली. याचा फायदा भाजप उमेदवार मनोज सोनकर यांना झाला आणि ते 16 मते मिळवत विजयी ठरले.

आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी चंदीगड महापालिका निवडणुकीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. "चंदीगडच्या महापौर निवडणुकीत ज्या पद्धतीने बेईमानी केली गेली, ते अत्यंत चिंताजनक आहे. हे लोक महापौरपदाच्या निवडणुकीत एवढी खालची पातळी गाठू शकतात, तर देशातील निवडणुकीत ते कोणत्याही थराला जाऊ शकतात. हे अत्यंत चिंताजनक आहे", असे केजरीवाल यांनी म्हटले आहे. तसेच, चंदीगड महापौर निवडणुकीत हेराफेरीचा आरोप करत आम आदमी पक्षाने न्यायालयात जाण्याचेही जाहीर केले आहे.

मतांचे समीकरण काय?

चंदीगड महापालिकेत महापौर निवडणुकीत मतांची संख्या 36 आहे. यात भाजपचे 14 नगरसेवक आहेत. संख्येच्या दृष्टीने भाजप सर्वात मोठा पक्ष आहे. तर 13 नगरसेवकांसह आप दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे. याच बरोबर काँग्रेसचे सात तर शिरोमणी अकाली दलाचा एक नगरसेवक आहे. या महापौर निडणुकीत चंदीगडच्या स्थानिक खासदारांनाही मतदानाचा अधिकार आहे. सध्या भाजपच्या किरण खेर या येथील खासदार असून त्यांनीही या निडणुकीत मतदान केले.

गणित कुठे बदलले?

या निवडणुकीत मत मिळवण्यासाठी 19 मतांचा आकडा गाठणे आवश्यक होते. भाजपकडे खासदार मिळून 15 मते होती. यात अकाली दलाचे एक मत जोडले तरी त्यांची संख्या 16 वर पोहोचत होती आणि तेवढीत मते भाजपला मिळाली आहेत.

दुसरीकडे आम आदमी पक्षाचे 13 नगरसेवक आणि काँग्रेसच्या 7 मिळून एकूण 20 मतांची संख्या होती. निवडणूक पार पडल्यानंतर आप-काँग्रेसच्या उमेदवाराला पडलेल्या 20 मतांपैकी 8 मते अवैध असल्याचे सांगत फेटाळल्याचे सांगितले जात आहे. आप आणि काँग्रेसच्या नगरसेवकांचे मत अवैध ठरवल्याने या ठिकाणी मोठा गोंधळ निर्माण झाला होता.

या निवडणुकीनंतर आप आणि काँग्रेसकडून हेराफेरीचा आरोप करण्यात आला आहे. काँग्रेसने एक व्हिडिओ ट्वि्ट करत लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप केला आहे. तसेच, जाणूनबुजून  छेडछाड करत आठ मते अवैध ठरवत भाजपला विजयी केल्याचा आरोप केला आहे.

सपा नेते अखिलेश यादव यांनीही या निवडणूक प्रक्रियेवर आरोप केले आहेत. "चंदीगड महापौर निवडणुकीत बहुमत नसतानाही ज्या पद्धतीने भाजपने सत्तेचा गैरवापर करून आणि अधिकाऱ्यांवर दबाव टाकून निवडणुकीत हेराफेरी केली , त्याची केवळ निवडणूक आयोगानेच नाही, तर माननीय सर्वोच्च न्यायालयाने, राज्यघटनेचे रक्षक या नात्याने त्याची तात्काळ दखल घेऊन हे निकाल रद्द करावेत", असे अखिलेश यांनी म्हटले आहे. तसेच, त्यांनी न्यायालयाला त्यांच्या देखरेखीखाली निवडणुका घेत, निष्पक्ष निकाल जाहीर करावा आणि या लोकशाही गुन्ह्यातील दोषींवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणीही केली आहे. भाजप लोकशाही गिळंकृत करत असून सत्तेची क्रूरता देशासाठी आणि जनतेसाठी अत्यंत घातक ठरेल, असेही अखिलेश म्हणाले आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in