चांद्रयान-३चा चंद्राच्या दिशेने प्रवास सुरू

या प्रक्रियेला शास्त्रीय भाषेत ट्रान्स-लुनार इंजेक्शन (टीएलआय) असे म्हटले जाते
चांद्रयान-३चा चंद्राच्या दिशेने प्रवास सुरू

बंगळुरू : भारताच्या महत्त्वाकांक्षी चांद्रयान-३ मोहिमेतील महत्त्वाचा टप्पा सोमवारी मध्यरात्री पार पडला. मध्यरात्री १२ ते १ वाजण्याच्या दरम्यान चांद्रयान-३ ने पृथ्वीची कक्षा सोडून चंद्राच्या दिशेने प्रत्यक्ष प्रवासाला सुरुवात केली. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) शास्त्रज्ञांनी या प्रवासाचे निरीक्षण सुरू केले आहे.

आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावरील श्रीहरिकोटा येथील तळावरून जीएसएलव्ही-मार्क ३ प्रक्षेपकाच्या माध्यमातून १४ जुलै रोजी चांद्रयान-३ चे यशस्वी प्रक्षेपण झाले होते. प्रक्षेपणानंतरच्या काही दिवसांत इस्रोने ५ ऑर्बिट-रेझिंग मनुव्हर्स करत क्रमाक्रमाने चांद्रयान-३ ला पृथ्वीपासून अधिकाधिक उंचीवरील कक्षेत पाठवले होते. तेथे फिरत असताना चांद्रयान-३ ने अधिकाधिक वेग प्राप्त केला आहे. आता सोमवारी रात्री १२ वाजल्यानंतर चांद्रयान-३ ला एखाद्या गोफणीतून सोडलेल्या दगडाप्रमाणे चंद्राच्या दिशेने पाठवण्यात आले. या प्रक्रियेला शास्त्रीय भाषेत ट्रान्स-लुनार इंजेक्शन (टीएलआय) असे म्हटले जाते.

साधारण तीन आठवड्यांचा प्रवास करून चांद्रयान-३ चंद्राच्या जवळ पोहोचेल. त्यानंतर त्याला चंद्राभोवतालच्या कक्षेत पाठवले जाईल आणि २३ किंवा २४ ऑगस्ट रोजी चांद्रयान-३ ला चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवण्यात येईल. ही सर्व प्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची असून, इस्रोच्या शास्त्रज्ञांनी त्याची बरीच पूर्वतयारी केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in