चांद्रयान-३ चंद्राच्या सर्वात समीप कक्षेत

लँडर आणि प्रॉपल्शन मोड्यूल आज विलग होणार
चांद्रयान-३ चंद्राच्या सर्वात समीप कक्षेत

बंगळुरू : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) बुधवारी चांद्रयान-३ ला चंद्राच्या आणखी समीपच्या कक्षेत पाठवले. आता चांद्रयान-३ चंद्रापासून कमीतकमी १५३ किमी आणि अधिकतम १६३ किमी अंतरावरील कक्षेत दाखल झाले आहे. यापुढे प्रॉपल्शन आणि लँडर मोड्यूल्स एकमेकांपासून विलग केली जातील. ती प्रक्रिया गुरुवारी (१७ ऑगस्ट रोजी) केली जाणार आहे.

श्रीहरीकोटा येथील तळावरून १४ जुलै रोजी प्रक्षेपण झाल्यानंतर चांद्रयान-३ ने ५ ऑगस्ट रोजी चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला होता. त्यानंतर ६, ९ आणि १४ ऑगस्ट रोजी इस्रोने क्रमाक्रमाने यानाला चंद्राच्या आणखी जवळच्या कक्षेत धाडले होते. बुधवारी अशा प्रकारची शेवटची प्रक्रिया पार पाडण्यात आली. त्यानंतर चांद्रयान-३ चंद्रापासून कमीतकमी १५३ किमी आणि जास्तीत जास्त १६३ किमीवरील कक्षेत दाखल झाले आहे. ही चांद्रयान-३ ची अपेक्षेनुसार चंद्रापासून सर्वांत कमी अंतरावरील कक्षा आहे.

आतापर्यंतची मोहीम अपेक्षेप्रमाणे पार पडली आहे. येथून पुढील टप्पा बराच संवेदनशील आणि जटिल आहे. आता यानाच्या प्रॉपल्शन मोड्यूलपासून लँडर मोड्यूल वेगळे केले जाईल. त्यानंतर लँडर मोड्यूलला चंद्राभोवती कमीतकमी ३० किमी आणि अधिकतम १०० किमी अंतरावरील कक्षेत पाठवले जाईल. या टप्प्यापर्यंत लँडर मोड्यूल चंद्राच्या पृष्ठभागाला बरेचसे समांतर पातळीत फिरत असेल. त्यावेळी यानाचा वेग एका सेकंदाला १.६८ किमी इतका असेल. नंतर यानाला चंद्रावर उतवण्यासाठी ९० अंशांच्या कोनात फिरवून चंद्राच्या पृष्ठभागाकडे आणले जाईल.

चांद्रयान-२ ची चूक सुधारण्याचा प्रयत्न

यानाला चंद्रावर उतरवताना वेग कमी करणे ही गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. चांद्रयान-२ मोहिमेवेळी आपली तेथेच चूक झाली होती. मात्र, यावेळी इस्रोने ती चूक दुरुस्त करण्यासाठी बराच अभ्यास केला आहे. चांद्रयान-३ अपेक्षेप्रमाणे २३ ऑगस्ट रोजी चंद्रावर सुखरूप उतरण्याची आशा आहे, अशी माहिती इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी दिली.

logo
marathi.freepressjournal.in