चांद्रयान-३ केवळ २५ किमी दूर

बुधवारी सायंकाळी ६.०४ वाजता चंद्रावर उतरणार
चांद्रयान-३ केवळ २५ किमी दूर

बंगळुरू : भारताच्या चांद्रयान-३ मोहिमेची प्रगती योग्य दिशेने सुरू असून, शनिवारी यानाचे लँडर मोड्यूल विक्रम चंद्रापासून २५ किमी अंतरावर पोहोचले आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) शास्त्रज्ञांनी यानाचा वेग कमी करण्यास सुरुवात केली असून, बुधवारी (२३ ऑगस्ट) सायंकाळी ६ वाजून ०४ मिनिटांनी यान चंद्रावर उतरवण्याची योजना आहे.

चांद्रयान-३ मोहीम आता अंतिम टप्प्यात पोहोचली असून, शनिवारी इस्रोने यानाला चंद्रापासून सर्वात कमी अंतरावरील कक्षेत पाठवले. आता चांद्रयान-३ चे लँडर मोड्यूल चंद्राच्या पृष्ठभागापासून कमीत कमी २५ किमी आणि अधिकतम १३४ किमी अंतरावरील कक्षेत फिरत आहे. यानाचा वेग हळूहळू कमी करण्यात येत असून, बुधवारी यानाला चंद्रावर उतरवण्यात येईल. यापूर्वी इस्रोने चांद्रयान-३ ला चंद्रावर उतरवण्याची वेळ बुधवारी सायंकाळी ५ वाजून ४७ मिनिटांनी नियोजित केली होती. मात्र, आता त्यात १७ मिनिटांचा फरक करून ही वेळ ६ वाजून ०४ मिनिटे अशी केली आहे.

चंद्रावर अवतरणाचे थेट प्रक्षेपण

चांद्रयान-३चे लँडर मोड्यूल बुधवारी सायंकाळी ६ वा. ०४ मिनिटांनी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणे अपेक्षित आहे. या ऐतिहासिक घटनेचे थेट प्रक्षेपण करण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) सज्ज झाली आहे. इस्रोची वेबसाइट, यूट्यूब चॅनेल, फेसबुक पेज आणि डीडी नॅशनल टेलिव्हिजन चॅनेलवरून या घटनेचे बुधवारी सायंकाळी ५ वाजून २७ मिनिटांपासून थेट प्रक्षेपण केले जाईल.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in