बंगळुरू : भारताच्या महत्त्वाकांक्षी चांद्रयान-३ या अंतराळ मोहिमेची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. चांद्रयान-३ जीएसएलव्ही-मार्क ३ या प्रक्षेपकावर बसवून उड्डाणासाठी सज्ज आहे, अशी माहिती इस्रोच्या वतीने देण्यात आली.
चांद्रयान-३ मोहिमेची सुरुवात १३ जुलै रोजी होईल, अशी माहिती यापूर्वी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) दिली होती. मात्र, हवामानाचा विचार करता १२ जुलै ते १९ जुलै दरम्यान योग्य वेळी त्याचे प्रक्षेपण केले जाईल, असे इस्रोने म्हटले आहे. त्या दृष्टीने बहुतांश तयारी पूर्ण झाली आहे. चांद्रयान-३ जीएसएलव्ही-मार्क ३ या प्रक्षेपक वाहनावर बसवून तयार आहे.
यापूर्वीच्या चांद्रयान-२ मोहिमेत विक्रम नावाचा लँडर चंद्रावर अंतिम टप्प्यात व्यवस्थित उतरू शकलेला नव्हता. ती त्रुटी दूर करण्यासाठी यावेळी यानाच्या रचनेत अनेक बदल केले आहेत. चांद्रयान-२ मोहिमेत लँडरच्या चंद्रावर उतरण्याचा वेग २ मीटर प्रतिसेकंद असा गृहित धरला होता, पण चांद्रयान-३ ची रचना ३ मीटर प्रतिसेकंद या वेगाने चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याच्या बेताने केली आहे, असे इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी सांगितले.
विक्रम लँडरमध्ये पूर्वीपेक्षा अधिक इंधन भरण्याची सुविधा केली आहे. त्यामुळे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरताना ते अधिक काळ फिरू शकेल किंवा परत येण्याची गरज भासल्यास तसेही करू शकेल. तसेच चंद्राच्या पृष्ठभागाचे निरीक्षण करण्यासाठी यानावर लेझर डॉप्लर व्हेलॉसिटी मीटर नावाचे यंत्र बसवले आहे. यानाच्या सॉफ्टवेअरमध्ये सुधारणा केली आहे. सुधारित रचनेनुसार यानाचे पाचवे इंजिन काढले आहे.