

नवी दिल्ली : येथील ‘भारत मंडपम’ येथे जगातील सर्वात मोठा तंत्रज्ञान कार्यक्रम ‘एआय इम्पॅक्ट समिट २०२६’ सुरू आहे. या जागतिक कार्यक्रमाच्या पहिल्याच दिवशी प्रचंड, गर्दीमुळे गोंधळ उडाला. तसेच काही जणांच्या सामानांची चोरीही झाल्याचे उघड झाले आहे. या गोंधळामुळे केंद्रीय माहिती-तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांना माफी मागावी लागली आहे.
या जागतिक परिषदेच्या पहिल्याच दिवशी स्टार्टअप संस्थापक, तंत्रज्ञान तज्ज्ञ व परदेशी पाहुणे हजर होते. सुरक्षेमुळे अनेक प्रवेशद्वारांवर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. जागतिक तंत्रज्ञान कंपन्यांच्या प्रतिनिधी व पाहुण्यांना अनेक तासांची प्रतीक्षा करावी लागली. अनेक ठिकाणी स्पष्ट सूचना नसल्याने गोंधळ निर्माण झाला. याशिवाय मोबाईल डाटा कनेक्टिव्हिटीही अनेकांना त्रासदायक ठरली.
गर्दीबाबतच्या टीकेला उत्तर देताना वैष्णव यांनी सांगितले की, सोमवारी ७० हजारांहून अधिक लोकांनी या समिटला उपस्थिती लावली. ही संपूर्ण जगातील सर्वात मोठी ‘एआय’ समिट आहे. त्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. कुणाला अडचण आली असेल तर आम्ही त्याबद्दल माफी मागतो, असे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, कोणत्याही अडचणी तत्काळ सोडवण्यासाठी ‘वॉर रूम’ कार्यरत करण्यात आली आहे. तुमचा कोणताही अभिप्राय आमच्याशी शेअर करा. आम्ही खुले मनाने तो स्वीकारू. सर्वांसाठी अनुभव अधिक सुरळीत आणि आनंददायी करण्याचा प्रयत्न करू, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या गोंधळात काही उपस्थितांनी वस्तू हरवल्या किंवा चोरीला गेल्याच्या तक्रारी केल्या. ‘निओसॅपियन’चे मुख्य कार्यकारी अधिकारी धनंजय यादव यांनी एक्सवर पोस्ट करत वेअरेबल्स चोरीला गेल्याची तक्रार नोंदवली.
उच्च-सुरक्षा क्षेत्रात निवास, लॉजिस्टिक्स आणि स्टॉलसाठी पैसे भरूनही आमची उपकरणे गायब होतात. हे अत्यंत निराशाजनक आहे. सुरक्षा आणि अधिकृत ताफ्यालाच प्रवेश असताना हे कसे घडले? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
‘रिस्कील’चे संस्थापक पुनीत जैन यांनीही नाराजी व्यक्त केली. ‘एआय’ समिट स्वतःच्या निर्मात्यांनाच बाजूला सारते का? प्रदर्शक, प्रतिनिधी, स्टार्टअप संस्थापक बाहेरच थांबले. पाणी नाही, स्पष्टता नाही. मीडियात उत्सव, प्रत्यक्षात मात्र गोंधळ. निवडक उच्च-मूल्य पाहुण्यांपुरताच प्रवेश ठेवायचा असेल तर आधीच स्पष्ट सांगा,’ असे त्यांनी सांगितले. मात्र, मंगळवारी त्यांनी सांगितले की, पहिल्या दिवशी काही कार्यान्वयनातील अडचणी होत्या, पण त्यानंतर समन्वय आणि प्रवेश व्यवस्थापनात लक्षणीय सुधारणा झाली.
उद्योजक प्रियांशू रत्नाकर यांनीही लांब रांगा, प्रदर्शकांना स्टॉलमध्ये प्रवेश न मिळणे, कमकुवत वाय-फाय व मोबाईल नेटवर्क आणि वारंवार नोंदणीतील अडचणी यांकडे लक्ष वेधत ‘अंमलबजावणीपेक्षा केवळ दिखावा’ असा आरोप केला.
दरम्यान, आयोजकांनी सांगितले की, गर्दी कमी करण्यासाठी आणि समन्वय सुधारण्यासाठी दिवसभर दुरुस्ती उपाययोजना राबवण्यात आल्या असून, उर्वरित दिवसांत व्यवस्था अधिक सुरळीत राहील. मोठ्या तंत्रज्ञान कंपन्या आणि आंतरराष्ट्रीय नेत्यांचा सहभाग पुढेही सुरू राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
कौशल्यविकासावर पूर्ण ताकद लावा
भारतीय आयटी उद्योगाला मनुष्यबळाचे कौशल्य विकासावर पूर्ण ताकदीने काम करण्याचा सल्ला केंद्रीय मंत्री वैष्णव यांनी दिला. कोणतेही तांत्रिक संक्रमण घडते तेव्हा ते उद्योग, शैक्षणिक क्षेत्र आणि सरकार यांच्या संयुक्त प्रयत्नांतूनच योग्यरीत्या हाताळले जावे लागते. सरकार सध्या उद्योग आणि शिक्षण संस्थांसोबत तीन समांतर आघाड्यांवर काम करत आहे.
एआयचा गैरवापर रोखायला जागतिक सहमतीचा प्रयत्न
कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) योग्य, नैतिक आणि जबाबदार वापर सुनिश्चित करून ती मानवतेच्या कल्याणासाठी वापरता यावी, तसेच तिच्या गैरवापरातून उद्भवणारे धोके रोखता यावेत, यासाठी जागतिक नेत्यांमध्ये सहमती निर्माण करण्याचा भारताचा प्रयत्न असल्याचे केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंगळवारी सांगितले. एआयमध्ये पाच स्तरांमध्ये येत्या दोन वर्षांत सुमारे २०० अब्ज अमेरिकी डॉलर गुंतवणूक अपेक्षित असल्याचे त्यांनी नमूद केले. डीपटेक स्टार्टअप्समध्ये व्हेंचर कॅपिटल गुंतवणूकदारांची बांधिलकी स्पष्टपणे दिसत असून, येत्या काळात भारतातून किमान ५० डीपटेक कंपन्या उदयास येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
‘एआय’मुळे भारताच्या आरोग्य सेवेत आमूलाग्र बदल शक्य; नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांची माहिती
कृत्रिम बुद्धिमत्ता भारताच्या आरोग्यसेवा क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणण्याची तसेच सार्वत्रिक आरोग्य विस्ताराची वाटचाल वेगाने करण्याची एक धोरणात्मक संधी उपलब्ध करून देत आहे, असे नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल (आरोग्य) यांनी सांगितले. इंडिया एआय इम्पॅक्ट समिट २०२६ अंतर्गत ‘भारत मंडपम’ येथे झालेल्या सत्रात ते बोलत होते.
ते म्हणाले की, भारताचा प्रचंड व्याप, विविधता आणि संसर्गजन्य तसेच असंसर्गजन्य आजारांचे दुहेरी ओझे लक्षात घेता, सेवा वितरण मजबूत करण्यासाठी आणि आरोग्य परिणाम सुधारण्यासाठी तंत्रज्ञानाधारित, पुराव्यांवर आधारित उपाययोजना अत्यावश्यक आहे. भारताच्या वाढत्या डिजिटल सार्वजनिक आरोग्य पायाभूत सुविधांमध्ये ‘एआय’चे एकत्रीकरण केल्यास परस्परसुसंगतता, रिअल-टाइम विश्लेषण आणि संपूर्ण आरोग्य प्रणालीत अधिक कार्यक्षम संसाधन वाटप शक्य होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. ‘एआय’मुळे प्राथमिक आरोग्यसेवा अधिक सक्षम होऊ शकते, लवकर निदान शक्य होते आणि डेटावर आधारित धोरणनिर्मितीला आधार मिळतो, असे त्यांनी अधोरेखित केले. तसेच सुरक्षितता आणि जनतेचा विश्वास टिकवून ठेवण्यासाठी मजबूत नियामक चौकट, नैतिक संरक्षण आणि सातत्यपूर्ण पडताळणीचे महत्त्वही त्यांनी नमूद केले.