नवी दिल्ली : दिल्लीत २०२० साली झालेल्या दंगलीतील एका प्रकरणात येथील न्यायालयाने सहा जणांवर आरोपपत्र दाखल केले आहे.
दिल्लीच्या ईशान्य भागात २०२० साली दंगल उसळली होती. मेन खजुरी पुस्ता रोडवर २५ फेब्रुवारी २०२० रोजी जमावाने शाहबाज नावाच्या व्यक्तीला जिवंत जाळले होते. त्या प्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश पुलस्त्या प्रमाचला यांच्यासमोर सुनावणी होत होती. अमन, विक्रम, राहुल शर्मा, रवी शर्मा, दिनेश शर्मा आणि रणजित राणा हे त्यात प्रमुख आरोपी होते. मृत व्यक्तीच्या डीएनए तपासणीनंतर या सहा जणांविरुद्ध आरोप निश्चित करण्यात आले. या सहा जणांवर करवाल नगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता.