आंतरराष्ट्रीय तेल बाजारात कच्च्या तेलाचे भाव गेल्या चार महिन्यांपासून घसरत आहेत. असे असतानाही भारतात इंधनदरात कपात केली जात नाही. त्यामुळे वाहनधारकांना स्वस्त इंधन मिळत नाही आणि दुसरीकडे वाहतुकीच्या खर्चातही झालेली वाढ कमी होत नसल्याने बहुतांश वस्तुंचे दर वाढले आहेत.
आंतरराष्ट्रीय तेल बाजारात क्रूड ऑईलच्या किमती अनेक दिवसांपासून १०० डॉलर प्रति बॅरलपेक्षा कमी आहेत. गेल्या कही दिवसांपासून त्या ९० डॉलरच्या आसपास आहेत. कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण सुरु असली त्याचा लाभ जनतेला मिळण्याची कुठलीही चिन्हे अद्याप दिसत नाहीत.
पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांनी इंधनदरात घट न होण्याचे कारण सांगितले आहे. तेल कंपन्यांचे गेल्या काही दिवसांपासून नुकसान भरुन निघाले नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर घसरले असले तरी त्याचा फायदा देशभरातील वाहनधारकांना झाला नाही. कारण अद्याप तोटा असताना कंपन्या दर कपातीला विरोध करत आहेत.
कच्च्या तेलाच्या किंमतीत कमालीची घसरण सुरु आहे. एप्रिल महिन्यात मात्र रशिया आणि युक्रेन युद्धाचा मोठा फटका तेल कंपन्यांना बसला. त्यांना चढ्या दराने, वाढीव भावाने इंधन खरेदी करावे लागेल. पण देशात त्यांना किमती वाढविता आल्या नाही. त्यामुळे तेल कंपन्यांचे नुकसान झाले.
७ एप्रिल २०२२ इंधनाच्या किंमतीत बदल झालेला नाही. २२ मे रोजी केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केली होती. तर काही राज्यांनीही त्यांच्या शुल्कात कपात केली होती. अबकारी कर कमी झाल्याने काही राज्यात पेट्रोल-डिझेलच्या किमतीत १० रुपयांपर्यंत कपात झाली होती; परंतु मे अखेर ते सप्टेंबर महिना संपत आला तरी इंधन स्वस्त होत नाही.