नवी दिल्ली : कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने त्यांच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांना बायजूच्या ताळेबंदांची तपासणी जलद गतीने करण्यास आणि अहवाल सादर करण्यास सांगितले आहे, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सोमवारी सांगितले. कंपनी कायद्याची अंमलबजावणी करणारे कॉर्पोरेट मंत्रालय त्यांच्या प्रादेशिक कार्यालयाकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाईचा निर्णय घेईल.
कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने हैदराबाद येथील प्रादेशिक संचालकांच्या कार्यालयाला जुलै २०२३ मध्ये बंगळुरूमध्ये नोंदणीकृत असलेल्या थिंक अँड लर्न प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची (ज्यांचा बायजू ब्रँड आहे) तपासणी करण्यास सांगितले होते.
वरिष्ठ अधिकाऱ्याने सोमवारी सांगितले की, कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने बाजयूच्या संदर्भात वेगाने तपासणी करण्याचा आणि अहवाल सादर करण्यास सांगितले. तपासणीबाबत नेमके तपशील लगेच मिळू शकले नाहीत. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) देखील काही आर्थिक वर्षांसाठी एडटेक फर्मने केलेल्या आर्थिक खुलाशांचा शोध घेत आहे. आयसीएआयचे अध्यक्ष रणजीत कुमार अग्रवाल यांनी गेल्या आठवड्यात सांगितले की, या प्रकरणाची तपासणी सुरू आहे. २३ फेब्रुवारी रोजी बायजूच्या भागधारकांनी संस्थापक सीईओ, रवींद्रन आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना भारतातील सर्वात लोकप्रिय टेक स्टार्टअपमध्ये कथित गैरव्यवस्थापन आणि अपयश या कारणावरून काढून टाकण्यासाठी एकमताने मतदान केले. तथापि, कंपनीने संस्थापकांच्या अनुपस्थितीत केलेले मतदान अवैध आणि अयोग्य असल्याचे म्हटले होते.
संस्थापक सीईओ रवींद्रन बायजू, त्यांची पत्नी आणि भाऊ - कंपनीच्या संचालक मंडळातील फक्त तीन सदस्य - सहा गुंतवणूकदारांच्या गटाने बोलावलेल्या एक्स्ट्राऑर्डिनरी जनरल मीटिंगपासून (एजीएम) दूर राहिले, ज्यांचा एकत्रित हिस्सा ३२ टक्क्यांपेक्षा जास्त आहे.