अमेरिकेने दिलेला पुरावा तपासू! पन्नू प्रकरणी मोदी यांचे प्रथमच जाहीर वक्तव्य

अमेरिका आणि कॅनडातील वाढत्या खलिस्तानी कारवायांबद्दल त्यांनी काळजीही व्यक्त केली.
अमेरिकेने दिलेला पुरावा तपासू! पन्नू प्रकरणी मोदी यांचे प्रथमच जाहीर वक्तव्य

नवी दिल्ली : खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याला अमेरिकी भूमीत ठार मारण्याच्या कथित कटाविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन सोडून प्रथमच जाहीर वक्तव्य केले. फायनान्शियल टाइम्सला दिलेल्या खास मुलाखतीत मोदी यांनी म्हटले की, या प्रकरणी अमेरिकेने दिलेला पुरावा आम्ही तपासून पाहू. भारत आणि अमेरिकेचे संबंध दृढ असून अशा काही प्रकरणांमुळे त्यांच्यावर परिणाम होणार नाही, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली. तसेच अमेरिका आणि कॅनडात सध्या खलिस्तान समर्थकांच्या कारवाया वाढल्या असल्याबद्दल चिंताही व्यक्त केली.

पन्नू हा सध्या न्यूयॉर्कमध्ये राहत असून त्याने तेथून भारतविरोधी कारवाया चालवल्या आहेत. त्याने भारतीय संसदेवर हल्ला करण्याची धमकीही दिली होती. भारतीय गुप्तहेर संस्थांनी पन्नू याला अमेरिकेत ठार मारण्याचा कट रचला होता, असा दावा अमेरिकेने केला आहे. या प्रकरणी एका भारतीय अधिकाऱ्यावर अमेरिकेने आरोप केले आहेत. या प्रकरणाचा अमेरिका तपास करत असून त्यात भारताने सहकार्य करावे, अशी मागणी अमेरिकेने केली होती. तसेच भारतानेही स्वतंत्रपणे याचा तपास करावा, असे अमेरिकेने म्हटले आहे. अमेरिकेने हे प्रकरण अत्यंत गांभीर्याने घेतले असल्याचे व्हाइट हाऊसने स्पष्ट केले होते.

पन्नू प्रकरणावर आजवर मोदी यांनी कोणतेही भाष्य केले नव्हते. आता खास मुलाखतीत मोदी यांनी हे मौन सोडले असून अमेरिकेने काही ठोस पुरावा सादर केला तर त्यात लक्ष घालण्याचे आश्वासन दिले. भारताचा कायद्याच्या राज्यावर विश्वास आहे. आमच्या कोणत्याही नागिरकांने काही चांगले किंवा वाईट कृत्य केले असेल तर आम्ही त्यात लक्ष घालू, असे मोदी यांनी मुलाखतीत म्हटले आहे.

मात्र, अशा प्रकरणांमुळे दोन्ही देशांच्या संबंधांवर परिणाम होणार नाहीत, असेही मोदी यांनी सांगितले. भारत आणि अमेरिका यांचे संरक्षण, दहशतवादविरोधी कारवाया आदी विषयांवर सहकार्याचे धोरण आहे. हे संबंध वृद्धिंगत होत आहेत. एका एखाद्या-दुसऱ्या प्रकरणामुळे त्यांच्यावर परिणाम होणार नाही, असे मोदी यांनी सांगितले. मात्र, अमेरिका आणि कॅनडातील वाढत्या खलिस्तानी कारवायांबद्दल त्यांनी काळजीही व्यक्त केली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in