
नवी दिल्ली : भारताच्या चित्ता पुनर्वसन कार्यक्रमाच्या अल्पकालीन यशाचे मूल्यांकन करण्यासाठी निश्चित केलेल्या सहा निकषांपैकी चार निकषांची पूर्तता झाली आहे, असा जावईशोध सरकारी अहवालात नमूद करण्यात आला आहे.
देशातील चित्ता नामशेष झाल्यानंतर त्यांना पुन्हा आणण्याच्या भारताच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा रविवारी पहिला वर्धापन दिन झाला. गेल्या वर्षी १७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये नामिबियातील चित्त्यांचा समूह सोडला, तेव्हा या प्रकल्पाची सुरुवात झाली. नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेतून कुनो येथे दोन बॅचमध्ये वीस चित्त्यांची आयात करण्यात आली. मार्चपासून यातील सहा प्रौढ चित्त्यांचा विविध कारणांमुळे मृत्यू झाला आहे.
कार्यक्रमाचे एक वर्ष पूर्ण झाल्यावर प्रसिद्ध झालेल्या या अहवालात असे दिसून आले आहे की, प्रकल्पाने अनुकूल दिशेने मार्गक्रमण केले आहे. या संदर्भातील आव्हाने फार मोठी आहेत. त्यावर जास्त भर दिला जाऊ शकत नाही. तथापि, भारत, नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेतील अधिकारी आणि व्यवस्थापकांच्या एकत्रित प्रयत्नांनी प्रकल्प यशाच्या मार्गावर आहे, असे अहवालात म्हटले आहे.