कुनोमध्ये चित्ते बघण्यास मनाई

उर्वरित चित्त्यांना राजस्थान किंवा अन्य ठिकाणी हलवण्याची मागणी याचिकाकर्त्याने केली आहे
कुनोमध्ये चित्ते बघण्यास मनाई

कुनो : सततच्या मृत्यूंमुळे मध्य प्रदेशमधील श्योपूर येथील कुनो नॅशनल पार्कमध्ये आता पर्यटकांना चित्ते पाहता येणार नाहीत. चित्त्यांच्या मृत्यूनंतर त्यांना खुल्या जंगलातून पकडून आरोग्य तपासणीसाठी दुसरीकडे हलवण्यात आले आहे. गेल्या चार महिन्यांत ८ चित्त्यांचे मृत्यू झाल्यानंतर सर्व चित्त्यांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे.

कुनो नॅशनल पार्कच्या व्यवस्थापनाने पाच दिवसांत ६ चित्त्यांना खुल्या जंगलातून पकडून बंदोबस्तात आणले आहे. त्यापैकी पवन, गौरव, शौर्य, आशा, धीरा, गामिनी या चित्त्यांना शांत करून घेरण्यात आले. या चित्तांच्या गळ्यातील रेडिओ कॉलरही काढण्यात आले आहेत. तज्ज्ञांच्या मते, रेडिओ कॉलर हे चित्त्यांच्या मृत्यूचे कारण ठरले होते. या कॉलरमुळे त्यांना जखमा होत होत्या, असे आढळून आले आहे.

११ जुलै रोजी तेजस आणि १४ जुलै रोजी सूरज या चित्त्यांचा मृत्यू झाल्यानंतर इतर चित्त्यांच्या आरोग्य चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये आणखी तीन चित्त्यांच्या मानेमध्ये संसर्ग आढळून आला. रेडिओ कॉलरमुळे ही जखम झाली होती, ज्यामुळे या चित्त्यांचा मृत्यू झाला. चित्त्यांवर जो कॉलर आयडी लावण्यात आला होता, तो कॉलर आयडी वाघासाठी तयार करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या कॉलर आयडींमुळे चित्त्यांच्या मानेवर जखमा होऊन त्यात किडे लागण्यास सुरुवात झाली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतातून नामशेष झालेला चित्ता परत आणण्यासाठी १७ सप्टेंबर २०२२ रोजी चित्ता प्रकल्पाची सुरुवात केली होती, पण एकामागून एक चित्त्यांचा मृत्यू होत आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या अधिवेशनात वनमंत्री विजय शाह यांनी चित्ता प्रकल्पावर आतापर्यंत एकूण ३२ कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती दिली आहे.

सुप्रीम कोर्टाने मागवला अहवाल

चित्त्यांच्या मृत्यूप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने केंद्राकडून सविस्तर अहवाल मागवला आहे. यावर आता पुढील सुनावणी १ ऑगस्टला होणार आहे. चित्त्यांच्या मृत्यूबाबत सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. उर्वरित चित्त्यांना राजस्थान किंवा अन्य ठिकाणी हलवण्याची मागणी याचिकाकर्त्याने केली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in