
श्रीनगर : यंदाचा स्वातंत्र्यदिन खास असणार आहे. कारण यंदा १५ ऑगस्टला जम्मू-काश्मीरच्या रियासी जिल्ह्यात बांधण्यात आलेल्या जगातील सर्वात उंच स्टीलच्या आर्च ब्रिजवरून पहिली रेल्वे धावणार आहे. सांगलदन ते रियासीदरम्यान धावणारी ही रेल्वे सेवा उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल लिंक प्रकल्पाचा एक भाग आहे.
या पुलाचे वैशिष्ट्य म्हणजे तो पॅरिसच्या आयफेल टॉवरपेक्षा २९ मीटर उंच आहे. आयफेल टॉवरची उंची ३३० मीटर आहे, तर १.३ किमी लांबीचा हा पूल चिनाब नदीवर ३५९ मीटर उंचीवर बांधण्यात आला आहे. या पुलावर २० जूनला ट्रेनची ट्रायल रन झाली, तर १६ जूनला या पुलावर इलेक्ट्रिक इंजिनची चाचणी घेण्यात आली होती.
हा पूल ४० किलोपर्यंतची स्फोटके आणि ८ रिश्टर स्केलपर्यंतचे भूकंपाचे धक्के सहन करू शकतो. या पुलाचे पाकिस्तानी सीमेपासून हवाई अंतर केवळ ६५ किमी आहे. हा पूल सुरू झाल्यानंतर काश्मीर खोरे भारताच्या इतर भागांशी सर्व मोसमात ट्रेनद्वारे जोडले जाणार आहे.
पूल उभारणीसाठी लागली २० वर्षे
भारत सरकारने २००३ मध्ये खोऱ्याला देशाच्या इतर भागांशी जोडण्यासाठी चिनाब पूल बांधण्याचा निर्णय घेतला. त्याच वर्षी सरकारने चिनाब ब्रिज प्रकल्पालाही मान्यता दिली. हा पूल २००९ पर्यंत तयार होणार होता, मात्र त्याचे काम रखडले. आता जवळपास दोन दशकांनंतर चिनाब नदीवर बांधलेला पूल तयार झाला आहे. हा पूल पुढील १२० वर्षे कार्यान्वित राहील, असे सांगण्यात येते.