चेन्नईच्या विद्यार्थ्यांना ‘नासा’चा पुरस्कार; स्वस्त, स्वदेशी इंटरनेटचा प्रकल्प साकारला

जगात उपग्रहावर आधारित इंटरनेट मॉडेल व्यावसायिक तत्वावर सुरू आहेत. हे इंटरनेट पैसेवाल्यांनाच परवडू शकते. हे उपग्रहावर आधारित इंटरनेट गरीबांना वापरायला मिळावे यासाठी चेन्नईच्या अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी ‘आकाशनेट’ प्रकल्प यशस्वीपणे तयार केला. या प्रकल्पाला ‘नासा’चा पुरस्कार मिळाला आहे.
चेन्नईच्या विद्यार्थ्यांना ‘नासा’चा पुरस्कार; स्वस्त, स्वदेशी इंटरनेटचा प्रकल्प साकारला
चेन्नईच्या विद्यार्थ्यांना ‘नासा’चा पुरस्कार; स्वस्त, स्वदेशी इंटरनेटचा प्रकल्प साकारलाPhoto- X (@airnewsalerts)
Published on

चेन्नई : जगात उपग्रहावर आधारित इंटरनेट मॉडेल व्यावसायिक तत्वावर सुरू आहेत. हे इंटरनेट पैसेवाल्यांनाच परवडू शकते. हे उपग्रहावर आधारित इंटरनेट गरीबांना वापरायला मिळावे यासाठी चेन्नईच्या अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी ‘आकाशनेट’ प्रकल्प यशस्वीपणे तयार केला. या प्रकल्पाला ‘नासा’चा पुरस्कार मिळाला आहे.

चेन्नईच्या अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या संघाने जगभरातील १८ हजारांहून अधिक प्रकल्पांना मागे टाकले आहे. नासा इंटरनॅशनल स्पेस अॅप्स चॅलेंज २०२५ मध्ये ‘मोस्ट इन्स्पिरेशनल’ हा पुरस्कार पटकावला आहे. या संघाचा ‘आकाशनेट’ हा प्रकल्प भारतातील दुर्गम आणि ग्रामीण भागातील डिजिटल दरी भरून काढण्यासाठी वेगवान आणि कमी किमतीचे सॅटेलाइट इंटरनेट उपलब्ध करून देणार आहे.

‘आकाशनेट’ ही संकल्पना इस्रोने दीर्घकाळ दाखवून दिलेल्या कार्यतत्त्वज्ञानावर आधारित आहे,’ असे एसआरएम ईश्वरी इंजिनिअरिंग कॉलेजमधील इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंगचा द्वितीय वर्षाचा विद्यार्थी प्रशांत गोपालकृष्णन याने सांगितले.

जगातील सर्वात मोठ्या वार्षिक जागतिक हॅकाथॉनपैकी एक असलेल्या ‘नासा स्पेस अॅप्स चॅलेंजमध्ये ११,५५१ प्रकल्पांमधून हा प्रकल्प अव्वल १० मध्ये पोहोचला आणि ‘मोस्ट इन्स्पिरेशनल’ पुरस्काराचा मानकरी ठरला.

२०१२ मध्ये सुरू झालेल्या या स्पर्धेचा उद्देश नासाच्या उपग्रह, दुर्बिणी आणि मोहिमांमधील मुक्त व खुल्या डेटाचा वापर करून पृथ्वी आणि अवकाशासाठी नाविन्यपूर्ण उपाय विकसित करण्यास प्रोत्साहन देणे हा आहे. आमच्या प्रस्तावाला ‘नासाची मोहोर’ मिळाल्यामुळे सार्वजनिक डिजिटल उपयुक्ततेच्या रूपात हा प्रकल्प विकसित करण्यासाठी संस्थात्मक पाठबळ मिळेल, असा आम्हाला विश्वास आहे,’ असे गोपालकृष्णन म्हणाले.

बहुतेक जागतिक उपग्रह इंटरनेट प्रणाली या प्रामुख्याने व्यावसायिक मॉडेलवर चालतात. त्यांचे हार्डवेअर परदेशात आयात साहित्य व तंत्रज्ञान वापरून तयार होते आणि भारतात आणल्यानंतर त्याची किंमत मोठ्या लोकसंख्येसाठी परवडणारी राहत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

याच ठिकाणी इस्रोचे कार्यतत्त्वज्ञान कमी खर्चात, कार्यक्षमता व सुरक्षिततेशी तडजोड न करता अत्यंत विश्वासार्ह अवकाश तंत्रज्ञान विकसित करण्याची क्षमता — संघासाठी प्रेरणादायी ठरले, असे ते म्हणाले.

‘सार्वजनिकरीत्या उपलब्ध माहिती आणि प्रत्यक्ष प्रणालीतील मर्यादा लक्षात घेऊन, सॅटेलाइट ब्रॉडबँड पायाभूत सुविधांवर भारत-केंद्रित, कार्यक्षमतेवर आधारित दृष्टिकोन कसा लागू करता येईल, याचा आमच्या प्रकल्पात अभ्यास केला आहे,’ असे त्यांनी सांगितले.

या विजयी संघात इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन विभागातील राजालिंगम एन, राशी मेनन आणि शक्ती संजीव कुमार, तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंगमध्ये विशेष प्रावीण्य असलेले संगणक विज्ञान विभागातील दीराज कुमार आणि मनीष वर्मा डी यांचा समावेश आहे.

यंदा जूनमध्ये कॉलेजच्या ओडिसी स्पेस क्लबमार्फत ‘नासा स्पेस अॅप्स चॅलेंज’बाबत माहिती मिळाल्याचे गोपालकृष्णन यांनी सांगितले. सहा सदस्यांच्या संघाची निवड वैयक्तिक कौशल्यांनुसार करण्यात आली. इलेक्ट्रॉनिक्स विद्यार्थ्यांनी हार्डवेअर व कम्युनिकेशन डिझाइनवर लक्ष केंद्रित केले, तर संगणक विज्ञान विद्यार्थ्यांनी सॉफ्टवेअर आणि सिम्युलेशनची जबाबदारी सांभाळली. दोन ते तीन महिन्यांच्या कालावधीत आम्ही संकल्पनेचा विस्तार करण्यावर काम केले. नासाने दिलेल्या विविध समस्यांचा अभ्यास करून ‘एलईओचे व्यापारीकरण’ या विषयावर लक्ष केंद्रित केले. तो आमच्या तांत्रिक दिशेला आणि सामाजिक उद्दिष्टांना पूरक असल्याचे आम्हाला जाणवले,” असे त्यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in