

बिजापूर : नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येवर पुन्हा एकदा सुरक्षा दलांवर मोठा हल्ला झाला आहे. कर्रेगुट्टा टेकड्यांच्या घनदाट जंगलात नक्षलवाद्यांनी पेरलेल्या अनेक प्रेशर आयईडी स्फोटांच्या मालिकेत ११ सुरक्षा रक्षक जखमी झाले आहेत. रविवारी नक्षलविरोधी मोहिमेदरम्यान ही घटना घडली असून सोमवारी बिजापूर पोलिसांनी याला अधिकृत दुजोरा दिला.
जखमी झालेल्या ११ जवानांपैकी १० जवान हे राज्य पोलिसांच्या विशेष जिल्हा रिझर्व्ह गार्ड पथकाचे आहेत, तर एक जवान सीआरपीएफच्या एलिट कोब्रा बटालियनचा आहे. जखमी कोब्रा जवानाची ओळख उपनिरीक्षक रुद्रेश सिंह (२१० वी बटालियन) अशी आहे. रुद्रेश सिंह आणि अन्य दोन डीआरजी जवानांच्या पायांना गंभीर दुखापत झाली आहे, तर सर्वात चिंताजनक बाब म्हणजे तीन जवानांच्या डोळ्यांत स्फोटातील छर्रे घुसले आहेत. सर्व जखमींना तातडीने हेलिकॉप्टरने रायपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे.
ज्या कर्रेगुट्टा टेकड्यांच्या परिसरात हा हल्ला झाला, तो भाग नक्षलवाद्यांचा सर्वात सुरक्षित तळ मानला जातो. यापूर्वी एप्रिल-मे २०२५ मध्ये सुरक्षा दलांनी येथे २१ दिवसांची सर्वात मोठी मोहीम राबवली होती. त्या मोहिमेत सुरक्षा दलांनी ३१ नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले होते. तसेच ३५ अत्याधुनिक शस्त्रे, ४५० पेक्षा जास्त सुरुंग आणि सुमारे १२ हजार किलो रसद व साहित्य जप्त केले होते. या मोठ्या कारवाईचा बदला घेण्यासाठी नक्षलवाद्यांनी हा सापळा रचल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
नक्षलविरोधी मोहिमेला वेग
नक्षलवाद्यांचा प्रभाव कमी करण्यासाठी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ताडपाला गावात सुरक्षा दलांचा नवीन कॅम्प उभारण्यात आला होता. तेव्हापासून नक्षलवादी सातत्याने सुरक्षा दलांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करत आहेत. स्फोटानंतर संपूर्ण जंगलाला वेढा घालण्यात आला असून अतिरिक्त कुमक पाठवून नक्षल्यांचा शोध घेतला जात आहे.