छत्तीसगडमध्ये ३ नक्षलवादी ठार; तीन राज्यांच्या सुरक्षा दलांनी १ हजार नक्षलवाद्यांना घेरले, कारवाईत २० हजार सुरक्षा जवानांचा सहभाग

छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्याच्या कॅरेगुट्टा जंगल भागात सुरक्षा दलांकडून मोठी नक्षलविरोधी मोहीम सुरू करण्यात आली असून या कारवाईत ३ महिला नक्षलवादी ठार झाले आहेत.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

बिजापूर : छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्याच्या कॅरेगुट्टा जंगल भागात सुरक्षा दलांकडून मोठी नक्षलविरोधी मोहीम सुरू करण्यात आली असून या कारवाईत ३ महिला नक्षलवादी ठार झाले आहेत. छत्तीसगड, तेलंगणा आणि महाराष्ट्रातील २० हजार सुरक्षा कर्मचाऱ्यांचा या मोहिमेत सहभाग असल्याने ही देशातील आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. बिजापूर जिल्ह्यातील कॅरेगुट्टा जंगल भागात सुमारे १ हजार नक्षलवाद्यांना घेरले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

ही कारवाई सुमारे ४८ तासांपासून सुरू आहे. मोस्ट वॉन्टेड कमांडर हिडमा आणि बटालियन प्रमुख देवा यांच्यासह प्रमुख नक्षलवादी नेत्यांच्या हालचालींबद्दल गुप्त माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई सुरू करण्यात आली. नक्षलवाद्यांच्या पलायनाचे सर्व मार्ग बंद करण्यासाठी सुरक्षा दलांनी संवेदनशील छत्तीसगड-तेलंगणा सीमेवरील कर्रेगुट्टा भागाला घेरले आहे. घनदाट जंगल आणि टेकड्यांनी वेढलेला हा परिसर माओवाद्यांच्या बटालियन क्रमांक १ चा अड्डा मानला जातो.

जिल्हा राखीव रक्षक दल, बस्तर फायटर्स, विशेष टास्क फोर्स, राज्य पोलिसांच्या सर्व तुकड्या, केंद्रीय राखीव पोलीस दल आणि त्यांच्या कमांडो बटालियन फॉर रिझोल्यूट ॲक्शन यांच्यासह विविध तुकड्यांतील सुरक्षा कर्मचारी या कारवाईत सहभागी झाले आहेत.

या वर्षात १५० नक्षलवादी ठार

यावर्षी छत्तीसगडमधील विविध चकमकींत आतापर्यंत जवळपास १५० नक्षलवाद्यांना मारण्यात आले आहे. त्यात बस्तरमधील १२४ नक्षल्यांचा समावेश आहे. केंद्राने देखील झारखंडमध्ये नक्षलवाद्यांवर कारवाई केली. गेल्या आठवड्यात झारखंडमधील बोकारो जिल्ह्यात ‘सीआरपीएफ’चे कोब्रा कमांडो आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली. या चकमकीत ८ नक्षलवादी ठार झाले. त्यात एक कोटी रुपयांचे बक्षीस असलेल्या एका वरिष्ठ नक्षली म्होरक्याचा समावेश होता.

logo
marathi.freepressjournal.in