
नारायणपूर : देशातून ३१ मार्च २०२६ पर्यत नक्षलवादाचा पूर्ण नि:पात करण्याचे उद्दिष्ट केंद्र सरकारने जाहीर केले होते. त्याचाच एक भाग म्हणून सुरक्षा दलांनी बुधवारी गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेपासून २५ किलोमीटर अंतरावरील छत्तीसगडच्या अबुझमाड येथे केलेल्या कारवाईत २७ नक्षलवादी ठार झाले, तर एक पोलीस शहीद झाला. विशेष म्हणजे, या चकमकीत १ कोटीचे बक्षीस असलेला माओवादी नेता बसव राजू यालाही पोलिसांनी कंठस्नान घातले. नक्षलवाद्यांचा अत्यंत महत्त्वाचा म्होरक्या बसव राजू याचा या कारवाईत खात्मा झाल्याने सुरक्षा दलांना मिळालेले हे ऐतिहासिक यश असल्याचे मानले जात आहे. या मोहिमेत काही सुरक्षा जवान जखमी झाले आहेत.
कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचा (माओवादी) सरचिटणीस नंबाला केशव राव उर्फ बसव राजू याचा कारवाईत खात्मा करण्यात आला आहे. विविध राज्यांमधून त्याच्यावर पाच कोटींहून अधिक रकमेचे इनाम जाहीर करण्यात आले होते. नारायणपूर, दंतेवाडा, विजापूर आणि कोंडागावमधील जिल्हा राखीव दलांनी ही कारवाई केली.
या परिसरात २० मे रोजी रात्रीच्या सुमारास दंतेवाडा, बिजापूर, नारायणपूर आणि कोंडागाव जिल्ह्यातील ५०० हून अधिक ‘डीआरजी’ व इतर सुरक्षा जवानांनी नक्षलविरोधी अभियान राबविले. बुधवारी सकाळी नक्षलवाद्यांनी जवानांच्या दिशेने जोरदार गोळीबार केला. प्रत्युत्तरात सुरक्षा जवानांनी केलेल्या गोळीबारात २७ नक्षलवादी ठार झाले, तर एक पोलस शहीद झाला. घटनास्थळावरून पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर नक्षली साहित्य व शस्त्रे जप्त केली आहेत.
तेलंगणा आणि छत्तीसगड सीमेवरील करेगुट्टा टेकडीवर आठवडाभरापूर्वी सुरक्षा यंत्रणेणे नक्षलवाद्यांविरोधात सर्वात मोठे अभियान राबवले होते. २३ दिवस चाललेल्या या चकमकीत ३१ नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले होते. कुख्यात नक्षल कमांडर माडवी हिडमा नेतृत्व करीत असलेल्या सर्वात आक्रमक बटालियन क्रमांक १ चे जवळपास ७०० हून अधिक नक्षलवादी छत्तीसगड-तेलंगणा सीमवेरील करेगुट्टा टेकडीवर एकत्र आल्याची माहिती सुरक्षा यंत्रणेला मिळाली होती. यावरून केंद्र आणि राज्य सुरक्षा दलातील १० हजारहून अधिक जवानांनी ‘ऑपरेशन संकल्प’या नावाने मोहीम राबविली होती. छत्तीसगडमध्ये यावर्षी करण्यात आलेल्या विविध चकमकींमध्ये आतापर्यंत २०० नक्षलवादी ठार झाले आहेत. त्यापैकी १८३ जण बस्तर परिमंडळात ठार झाले आहेत.
सुरक्षा दलांचा अभिमान वाटतो - मोदी
छत्तीसगडमध्ये २७ नक्षलवाद्यांना कंठस्नान घालणाऱ्या सुरक्षा दलांचा आपल्याला अभिमान वाटतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. आपल्या सरकारने नक्षलवादाचा बीमोड करण्याचा निर्धार केला असून नागरिकांना शांतता आणि प्रगतीमय जीवन देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत, असेही मोदी यांनी म्हटले आहे.
शहांकडूनही सुरक्षा दलांचे अभिनंदन
छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांनी बुधवारी केलेल्या कारवाईत बसव राजू हा नक्षल चळवळीतील म्होरक्या ठार झाल्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली. गेल्या तीन दशकात करण्यात आलेल्या कारवाईत प्रथमच सरचिटणीस दर्जाचा म्होरक्या ठार झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने ३१ मार्च २०२६ पर्यंत देशातील नक्षलवादाचे समूळ उच्चाटन करण्याचे ठरविले आहे, असेही गृहमंत्री म्हणाले आणि त्यांनी सुरक्षा दलांचे अभिनंदन केले.