

छत्तीसगडमधील शक्ती जिल्ह्यातील सिंगीतेराई गावात वेदांत लिमिटेडच्या वीज प्रकल्पात झालेल्या बॉयलरच्या भीषण स्फोटातील मृतांचा आकडा वाढून १४ वर पोहोचला आहे. मंगळवारी दुपारी हा स्फोट झाला होता. जखमींपैकी आणखी एका कामगाराचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी बुधवारी दिली.
शक्तीचे पोलीस अधीक्षक यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी सुमारे २.३० वाजण्याच्या सुमारास बॉयलरमधून टर्बाइनकडे जाणाऱ्या उच्च दाबाच्या वाफेच्या स्टील पाइपमध्ये स्फोट झाला. या भीषण स्फोटात अनेक कामगार गंभीररीत्या भाजले गेले. घटनेत चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य १० जणांनी नंतर उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. मंगळवार आणि बुधवारच्या मध्यरात्री आणखी एका कामगाराचा मृत्यू झाला असून, मृतांचा आकडा १४ झाला आहे, अशी माहिती शक्तीचे पोलीस अधीक्षक (एसपी) प्रफुल्ल ठाकूर यांनी पीटीआयला दिली.
या घटनेत जखमी झालेल्या इतर २० कामगारांपैकी पाच जणांना पुढील उपचारांसाठी रायपूरला हलवण्यात आले असून, १५ जणांवर रायगढ जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत, असे त्यांनी सांगितले.
पंतप्रधानांसह मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर, चौकशीचे आदेश
या दुर्घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे. मृतांच्या कुटुंबियांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी २ लाख रुपये, तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच जखमींनी लवकर बरे होण्यासाठी त्यांनी प्रार्थना केली आहे. तर, छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साय यांनीही घटनेबद्दल शोक व्यक्त करत मृत कामगारांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. जखमींनाही ५० हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. तसेच बिलासपूर विभागीय आयुक्तांकडून या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
याव्यतिरिक्त, जिल्हा प्रशासनाने स्वतंत्र दंडाधिकारी चौकशी सुरू केली असून कंपनीकडूनही अंतर्गत तपास सुरू करण्यात आला आहे. दाभरा येथील उपविभागीय अधिकारी (SDM) यांना या चौकशीची जबाबदारी देण्यात आली असून ३० दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अपघाताचे कारण तांत्रिक बिघाड होते की मानवी चूक, तसेच सुरक्षा तपासण्या कशा करण्यात आल्या होत्या, याची सविस्तर चौकशी होणार आहे.
मॅनेजमेंटविरोधात FIR नोंदवा, न्यायालयीन चौकशी करा - काँग्रेसची मागणी
दुसरीकडे, विरोधी पक्ष काँग्रेसने या घटनेप्रकरणी प्रकल्प व्यवस्थापनाविरुद्ध एफआयआर दाखल करण्याची आणि न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केली आहे. काँग्रेसचे राज्य संवाद प्रमुख सुशील आनंद शुक्ला यांनी प्रकल्प व्यवस्थापनावर निष्काळजीपणाचा आरोप करत सरकारवर दोषींना वाचवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. तसेच, मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १ कोटी रुपये आणि जखमींना ५० लाख रुपयांची भरपाई देण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
प्रकल्पाची पार्श्वभूमी
सिंगीतेराई येथे १,२०० मेगावॅट क्षमतेचा (६०० मेगावॅटच्या दोन युनिट्सचा) कोळशावर आधारित वीज प्रकल्प उभारण्याचे काम २००९ मध्ये सुरू झाले होते. हा प्रकल्प मूळतः अथेना छत्तीसगड पॉवर लिमिटेड यांच्या मालकीचा होता. मात्र २०१६ ते २०२२ या कालावधीत तो रखडला होता. २०२२ मध्ये वेदांताने हा प्रकल्प ताब्यात घेतला. त्यानंतर गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये ६०० मेगावॅट क्षमतेचे युनिट पूर्ण करून कार्यान्वित करण्यात आले, तर दुसऱ्या युनिटचे काम अद्याप सुरू आहे.