
खवय्यांच्या आवडीचा पदार्थ असणाऱ्या ‘चिकन टिक्का मसाला’चा शोध लावणारे ७७ वर्षीय अली अहमद अस्लम यांचे आज निधन झाले. ग्लासगोमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या शीशमहल रेस्तराँने ही माहिती दिली. १९७०मध्ये अली अहमह अस्लम यांनी त्यांच्याच शीशमहल रेस्तराँमध्ये टोमॅटो सूपच्या सहाय्याने ‘चिकन टिक्का मसाला’ या डिशचा शोध लावला होता. जगभरामध्ये त्यांच्या या डिशला मांसाहारी खवय्यांनी चांगलीच पसंती दिली. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, तीन मुले आणि दोन मुली असा परिवार आहे.
अली अहमह अस्लम यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, "एका ग्राहकाने चिकन टिक्का फारच कोरडे असल्याची तक्रार केली होती. त्यानंतर मी चिकन टिक्का मसालाचा शोध लावला होता. आम्ही रेस्तराँमध्ये चिकन टिक्का बनवत होतो.” अशी माहिती अली यांनी दिली होती. ही डिश ब्रिटिश रेस्तराँमध्ये प्रचंड प्रसिद्ध झाली होती. अली हे मूळचे पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील होते. ते लहान असताना कुटुंब ग्लासगो येथे स्थलांतरित झाले होते. १९६४मध्ये त्यांनी शीशमहल रेस्तराँ सुरू केले होते.