

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील आगामी रेजीनगर आणि नंदीग्राम पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने तेथील 'एसआयआर' प्रकरणावर तातडीने सुनावणी घेण्यास आज स्पष्ट नकार दिला. सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर या विषयावर तत्काळ सुनावणी घेण्याची विनंती करण्यात आली होती.
वकिलांनी न्यायालयात बाजू मांडताना सांगितले की, या प्रकरणाची सुनावणी आधी २९ सप्टेंबर रोजी निश्चित करण्यात आली होती, परंतु कॉज लिस्टमध्ये (कार्याची सूची) त्याचा समावेश झालेला नाही. सध्या या प्रकरणाची पुढील तारीख ५ ऑक्टोबर दाखवली जात आहे, तर रेजीनगर आणि नंदीग्राममधील पोटनिवडणुकांसाठी ६ ऑक्टोबरपासून मतदान सुरू होत आहे.
मतदार यादीतून नावे वगळण्यात आल्याविरोधात हजारो अपिले प्रलंबित असल्याकडे वकिलांनी लक्ष वेधले. तसेच यातील अनेक नागरिकांना मागील निवडणुकांमध्येही मतदानाचा हक्क बजावता आला नव्हता, असा युक्तिवाद त्यांनी केला. मात्र, सरन्यायाधीशांनी हा युक्तिवाद फेटाळत "या फक्त पोटनिवडणुका आहेत," अशी टिप्पणी केली आणि न्यायालय ५ ऑक्टोबर रोजीच या विषयावर सुनावणी घेईल, असे स्पष्ट केले.