मुख्यमंत्री नितीश कुमार यांना 'ते' विधान भोवणार ; राष्ट्रीय महिला आयोगाचं विधानसभा अध्यक्षांना पत्र

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही महिला आयोगाने या पत्रात केली आहे.
मुख्यमंत्री नितीश कुमार यांना 'ते' विधान भोवणार ; राष्ट्रीय महिला आयोगाचं विधानसभा अध्यक्षांना पत्र

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मंगळवारी लोकसंख्या नियंत्रणासंदर्भात विधानसभेत केलेल्या बेताल वक्तव्यानंतर, केवळ बिहारच नव्हे, तर संपूर्ण देशातून त्यांच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे. या संदर्भात नितीश यांनीही जाहीर माफी मागितली आहे. मात्र, आता राष्ट्रीय महिला आयोगाने नितीश यांच्या वक्तव्याची दखल घेत थेट विधानसभा अध्यक्षांना याबाबत पत्र लिहिलं आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही महिला आयोगाने या पत्रात केली आहे.

नितीश यांचं स्पष्टीकरण

मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आपल्या विधानावर स्पष्टीकरण दिलं आहे. ते म्हणाले की, मी तर केवळ महिलांच्या संदर्भात बोललो होते. मी काही चुकीचं बोललो असेल तर माफी मागतो. जे लोक माझ्यावर टीका करत आहेत, मी त्यांच देखील अभिनंदन करतो, असं म्हणत त्यांनी विधानसभेतील वक्तव्यावर माफी मागितली आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या या विधानावरुन राजकारण तापतना दिसत आहे. भाजपच्या महिला नेत्यांनी नितीश कुमार यांची गाडी अडवून नारेबाजी केली तर एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन औवेसींनीही नितीश कुमार यांच्या विधानावरुन त्यांच्यावर टिका केली आहे. आता त्यांच्या या विधानाची महिला आयोगाने दखल घेत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

महिला आयोगाचं विधानसभा अध्यक्षांना पत्र

राष्ट्रीत महिला आयोगाने बिहार विधानसभा अवध बिहारी चौधरी यांना पत्र लिहून मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या विधानसभेतील तपासणी करावी आणि त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. राष्ट्रीय महिला आयोग १९९० च्या कलम १० अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन हे पत्र लिहून कारवाईची मागणी करण्यात आली आहे. तसंच नितीश कुमार यांच्या विधानाचा निषेधही केला आहे.

नेमकं काय म्हणाले होते नितीश कुमार ?

बिहार विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात मंगळवारी(७ नोव्हेंबर) चर्चेदरम्यान मुख्यमंत्री नितीशी कुमार म्हणाले होते. बिहारमध्ये महिलांची साक्षरता वाढली आहे. मुली शिक्षीत होत आहेत यामुळे लोकसंख्या नियंत्रणात येईल. हे समजावून सांगण्यासाठी त्यांनी एक विचित्र उदाहरण दिलं होतं. ते म्हणाले, लग्न झाल्यावर पुरुष रोज रात्री संबंध ठेवतात, त्यामुळे मुलं जन्माला येतात. महिला साक्षर असली तर ती पुरषाला नकार देऊ शकते. यामुळे लोकसंख्या नियंत्रणात येईल. दरम्यान, त्यांच्या या वक्तव्यामुळे त्यांच्यावर चोहोबाजूंनी टीका होताना दिसत आहे.

logo
marathi.freepressjournal.in