भोपाळ : यंदाच्या निवडणुकीच्या वर्षात मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी रक्षाबंधननिमित्त बहिणींना मोठी भेट दिली. रक्षाबंधनासाठी त्यांच्या खात्यात २५० रुपये टाकले आहेत. तर ऑक्टोबरपासून लाडली बहना योजनेत महिलांच्या खात्यात १२५० रुपये टाकले जाणार आहेत.
शिवराज सिंह यांनी महिलांसाठी विविध घोषणा केल्या. त्यात सरकारी नोकरीत महिलांना ३५ टक्के आरक्षण, श्रावणात महिलांना ४५० रुपयात गॅस सिलिंडर, ५० टक्के महिलांनी सहमती दिल्यास दारुचे दुकान बंद करणार आदी घोषणा त्यांनी केल्या. तसेच पोलीस भरतीत महिलांना ३० टक्के आरक्षण आहे. आता पोलीसबरोबरच सरकारी नोकरीत महिलांना ५० टक्के आरक्षण दिले जाईल, अशी घोषणा त्यांनी केली.
ते म्हणाले की, प्रत्येक महिलेचे उत्पन्न हे १० हजार रुपये प्रति महिना करायचे आहे. अनेक महिला बचत गटातून १० हजार रुपये कमवत आहेत. या बचत गटांना स्वयंरोजगारासाठी २ टक्के व्याजाने कर्ज दिले जाईल. अन्य व्याज सरकार भरेल. तसेच महिलांच्या नावाने कोणी संपत्ती खरेदी केल्यास एक टक्का मुद्रांक शुल्क लागेल. तसेच महिलांना उद्योग सुरू करायचा असल्यास त्यांना मदत केली जाईल. औद्योगिक क्षेत्रात भूखंड राखीव ठेवण्यात येईल, असे ते म्हणाले.