कोचिंग क्लासेसमध्ये १६ वर्षांखालील मुलांना प्रवेश नाही; शिक्षण खात्याची मार्गदर्शक तत्त्वे

मार्गदर्शक तत्वे बारावीनंतर जेईई, एनईईटी, सीएलएटी आदी प्रवेश परीक्षा व सर्व स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या कोचिंग क्लासेससाठी बनवली आहे.
कोचिंग क्लासेसमध्ये १६ वर्षांखालील मुलांना प्रवेश नाही; शिक्षण खात्याची मार्गदर्शक तत्त्वे
Published on

नवी दिल्ली : स्पर्धा परीक्षांच्या कोचिंग क्लासेसमध्ये १६ वर्षांखालील विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ नये, चांगल्या गुणांनी उत्तीर्ण करण्याची गॅरंटी देण्याबाबत बंदी घातली आहे. केंद्रीय शिक्षण खात्याने देशातील सर्व कोचिंग क्लासेससाठी मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत.

ही मार्गदर्शक तत्वे बारावीनंतर जेईई, एनईईटी, सीएलएटी आदी प्रवेश परीक्षा व सर्व स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या कोचिंग क्लासेससाठी बनवली आहे. विद्यार्थ्यांनी केलेली आत्महत्या, क्लासेसमध्ये लागलेली आग, कोचिंग सेंटरमधील सुविधांची कमतरता आदी बाबी पाहून शिक्षण विभागाने ही मार्गदर्शक तत्वे जारी केली.

या मार्गदर्शक तत्वानुसार, पदवीपेक्षा कमी पात्रतेचे शिक्षकांना नियुक्त करता येणार नाही, कोचिंग सेंटर्सकडून पालकांना भ्रामक आश्वासने देता येणार नाही. समुपदेशन यंत्रणेशिवाय कोणत्याही कोचिंग क्लासेसची नोंदणी केली जाणार नाही. क्लासना आपल्या शिक्षकाची पात्रता, अभ्यासक्रमाचा कालावधी, हॉस्टेल व फी आदींची माहिती दिली पाहिजे. कोचिंग क्लासेसमध्ये मुलांना होणाऱ्या मानसिक तणावावर लक्ष दिले पाहिजे, तणावपूर्ण वातावरणातून बाहेर पडण्यासाठी एक यंत्रणा तयार केली पाहिजे. मानसशास्त्रज्ञ, समुपदेशकाचे नाव, त्यांच्या कामाच्यावेळा आदींची माहिती विद्यार्थ्यांना दिली पाहिजे. वेगवेगळ्या अभ्यासक्रमासाठी ट्यूशन फी ठरवली पाहिजे. तसेच विद्यार्थ्याने अभ्यासक्रमाची फी भरली आहे. तसेच निर्धारित वेळेत तो अभ्यासक्रम सोडत असल्यास दहा दिवसात उर्वरित फी त्याला परत केली पाहिजे. अभ्यासक्रमाच्या काळात फी वाढवू नये. या मार्गदर्शक तत्वांचे पालन न केल्यास कोचिंग सेंटरवर १ लाख दंड व जास्त फी घेणाऱ्या कोचिंगची नोंदणी रद्द केली जाऊ शकते. ही सर्व मार्गदर्शक तत्वे तीन महिन्यांच्या आत लागू झाली पाहिजेत. तसेच सर्व कोचिंग सेंटर नियमांचे पालन करताहेत त्याची जबाबदारी राज्य सरकारवर राहील.

logo
marathi.freepressjournal.in