नवी दिल्ली : सोन्याच्या दरात मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. गेल्या आठवड्यात शुक्रवारी भारतात सोन्याचा दर १० ग्रॅमला ६७५०० रुपयांवर पोहोचला. एका दिवसात ९०० रुपयांनी सोन्याचे दर वाढले. या दरवाढीमुळे सर्वसामान्यांसोबतच व्यापारीही व गुंतवणूकदारही चक्रावले आहेत. सोन्याच्या दरात वाढ होण्यात चीनचा मोठा हात असल्याचे उघड झाले आहे.
चीनची मध्यवर्ती बँक आपला सोन्याचा साठा वाढवत आहे. चीनच्या सोन्याच्या साठ्यात १५ व्या महिन्यात तेजी आली आहे. चीनचा सोन्याचा साठा आता २२४५ टनावर पोहोचला आहे. ऑक्टोबर २०२२ च्या तुलनेत चीनच्या सोन्यात ३०० टनांनी वाढ झाली आहे. चीनच्या मध्यवर्ती बँकेसोबतच चीनचे नागरिकही मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी करत आहे. जगात चीन हा सोन्याचा मोठा खरेदीदार आहे. सोन्याच्या दरात वाढ होत असतानाही चिनी लोक नाणी, सोन्याच्या लगडी, दागिने खरेदी करत आहेत. कारण चीनच्या शेअर बाजार व मालमत्ता विभागाची अवस्था खराब आहे. त्यामुळे चिनी लोक आपली संपत्ती वाचवण्यासाठी सोन्यात मोठी गुंतवणूक करत आहेत. अमेरिकन डॉलर कमजोर झाल्याने त्यातच फेड रिझर्व्हच्या व्याजदरात कपात होण्याची शक्यता असल्याने आणि जगातील मध्यवर्ती बँका सोन्याची खरेदी वाढवत असल्याने सोन्याचे दरात वाढ होत आहे.
शुक्रवारी सोन्याचा दर २२०० डॉलर प्रति औंस पोहोचला. स्पॉट गोल्ड २१७९ डॉलर्स प्रति औंसवर बंद झाला. गेल्या आठवड्यात शुक्रवारचा सोन्याचा दर २०८२ रुपये प्रति औंस होता. फेड रिझर्व्ह व्याजदरात कपात करण्याचे संकेत मिळत असल्याने सोन्याचे दर वाढत आहेत.
कमोडिटी क्षेत्रातील तज्ज्ञाने सांगितले की, सोन्याच्या दरात वाढ होण्यास पाश्चिमात्य गुंतवणूकदार जबाबदार नाहीत. चीनमध्ये गेल्यावर्षी मोठ्या प्रमाणात सोने खरेदी झाली. आताही सोन्यात गुंतवणूक वाढली आहे. सोन्याने गुंतवणूकदारांना कधीही निराश केले नाही. सोन्याच्या दरात २४ वर्षांत ६०० टक्क्यांनी वाढ झाली आहे. अडचणीच्या काळात सोन्याच्या दरात वाढ होत असते.
सर्वात जास्त सोने कोणाकडे?
अमेरिकेच्या खजिन्यात ८१३३ टन, जर्मनी ३३५३ टन, इटलीकडे २४५२ टन, फ्रान्सकडे २४३७ टन, रशियाकडे २३३३ टन, स्वित्झर्लंडकडे १०४० टन, जपानकडे ८४७ टन, भारताकडे ८०१ टन, नेदरलँड ६१२ टन, तुर्कीये ४४० टन, तैवान ४२४ टन सोने आहे.