
तुकडा तांदळाच्या निर्यातीवर बंदी घालण्याच्या भारताच्या निर्णयामुळे चीनमध्ये अन्नसंकट निर्माण होऊ शकते. बीजिंग हा तुकडा तांदळाचा सर्वात मोठा खरेदीदार आहे. अशा परिस्थितीत भारताच्या या निर्णयाचा चीनमधील पुरवठा साखळीवर परिणाम होऊ शकतो. चीनमध्ये तुकडा तांदूळ प्रामुख्याने पशुखाद्य, नूडल्स आणि वाईन बनवण्यासाठी वापरला जातो.
भारत हा काही आफ्रिकन देशांना तुकडा तांदळाचा महत्त्वाचा पुरवठादार आहे; पण चीनच्या कृषी माहिती नेटवर्कने प्रसिद्ध केलेल्या अहवालात चीन हा भारतीय तुकडा तांदळाचा सर्वात मोठा खरेदीदार असल्याचा दावा करण्यात आला आहे. एप्रिल २०२१मध्ये भारतातून ११ लाख टन तुकडा तांदूळ आयात केला. त्याच वेळी, भारताने २०२१मध्ये विक्रमी २१.५ दशलक्ष टन तांदूळ निर्यात केला, जो जगातील प्रमुख चार निर्यातदार थायलंड, व्हिएतनाम, पाकिस्तान आणि अमेरिका यांच्या एकूण निर्यातीपेक्षा जास्त आहे. भू-राजकीय परिस्थितीमुळे तुकडा तांदळाची जागतिक मागणी वाढली आहे. त्यामुळे पशुखाद्यांसह इतर वस्तूंच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे, असे ग्राहक व्यवहार मंत्रालयाने म्हटले आहे.
भारत हा जगातील सर्वात मोठा तांदूळ निर्यात करणारा देश आहे. जागतिक निर्यातीत त्याचा वाटा ४० टक्के आहे. भारत १५० हून अधिक देशांना तांदूळ विकतो. रशिया-युक्रेन युद्ध, उष्णतेची लाट आणि जगातील अनेक भागांतील दुष्काळ यामुळे अन्नधान्याच्या किमतीत झपाट्याने वाढ झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत भारताच्या तुकडा तांदूळ निर्यातीवर बंदी घातल्याने चीनमधील अन्नसंकट वाढू शकते.