चीनचा आर्थिक विकास दर तिसऱ्या तिमाहीत 
३.९ टक्क्यांपर्यंत वाढला

चीनचा आर्थिक विकास दर तिसऱ्या तिमाहीत ३.९ टक्क्यांपर्यंत वाढला

३० सप्टेंबर रोजी संपलेल्या तिमाहीत जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था वार्षिक आधारावर ३.९ टक्क्यांनी वाढली आहे
Published on

शेजारी राष्ट्र चीनचा आर्थिक विकास दर जुलै-सप्टेंबर या तिमाहीत वेगवान झाला, परंतु त्याची गती अजूनही एका दशकातील सर्वात मंद आहे. चीनमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वारंवार करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे आर्थिक विकासाचा वेग मंदावला आहे.

सोमवारी जाहीर झालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, ३० सप्टेंबर रोजी संपलेल्या तिमाहीत जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था वार्षिक आधारावर ३.९ टक्क्यांनी वाढली आहे. यासह, या वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांत आर्थिक विकास दर तीन टक्के राहिला.

गेल्या आठवड्यात सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या बैठकीत आर्थिक वाढीचे आकडे जाहीर केले जाणार होते, पण नंतर बैठकच पुढे ढकलण्यात आली. यापूर्वी, एप्रिल-जून तिमाहीत, आर्थिक विकास दर तिमाही आधारावर २.६ टक्क्यांनी घसरला होता.

चीनमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वारंवार लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे आर्थिक विकास दर मंदावला असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. कोविड महामारी नियंत्रणात आणण्यासाठी चीन सरकार कठोर पावले उचलत आहे. शांघायसह अनेक औद्योगिक केंद्रांमधील निर्बंधांमुळे कामावर परिणाम होत आहे.

logo
marathi.freepressjournal.in