चीनची आगळीक; हवाई दलाचा ‘पराक्रम’

६८ हजार सैनिक, ९० रणगाडे पूर्व लडाखमध्ये केले तैनात
चीनची आगळीक; हवाई दलाचा ‘पराक्रम’

नवी दिल्ली : गलवान खोऱ्यात २०२० मध्ये चीनसोबत संघर्ष झाल्यानंतर भारताने त्याला तोडीस तोड उत्तर दिले. या संघर्षाच्या काळात भारतीय हवाई दलाने अत्यंत अल्पावधीत आपल्या अगडबंब विमानांचा वापर करून हवाई दलाने देशाच्या विविध भागातून ६८ हजार लष्करी जवान, ९० रणगाडे व अन्य शस्त्रासामुग्री पूर्व लडाखमध्ये तैनात केली आहे, अशी माहिती संरक्षण व सुरक्षा विभागांतील उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.

१५ जून २०२० मध्ये चिनी सैन्याने भारतीय हद्दीत प्रवेश करून चकमक घडवली. भारताने तोडीस तोड प्रत्युत्तर दिले. या संघर्षात भारताचे २० जवान शहीद झाले होते. ही गंभीर परिस्थिती पाहून भारताला तत्काळ चीनच्या सीमेवर सैन्याची कुमक वाढवणे गरजेचे होते. हे काम हवाई दलावर सोपवण्यात आले. हवाई दलाने देशाच्या विविध भागातील ६८ हजार जवान, ९० रणगाडे, ३३० बीएमपी कॉम्बॅट वाहने, रडार सिस्टीम, तोफा, अनेक यंत्रे तेथे वाहून नेली. चीनवर लक्ष ठेवायला भारतीय हवाई दलाने एसयू-३० एमकेयू सुखोई आणि जग्वार ही लढाऊ विमाने तैनात केली. शत्रूकडील गुप्त माहिती गोळा करण्याचे काम वेगाने सुरू होते. अत्यंत कमी वेळेत हवाई दलाच्या मालवाहतूक विमानांनी सैन्य व शस्त्रांची तत्काळ ने-आण केली. या भागातील तणाव पाहता हवाई दलाने मोठ्या प्रमाणावर वैमानिकविरहीत विमाने तैनात केली. चीनच्या सीमेवर ससाण्याच्या नजरेने देखरेख केली जात आहे.

भारत-चीन दरम्यान ३५०० किमीची प्रत्यक्ष नियंत्रण रेषा आहे. सरकारने या भागात मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा तयार करायला सुरुवात केली. लष्कराने सहज वाहून नेत्या येणाऱ्या ‘एम७७७’ अल्ट्रा लाईट होवित्झर तोफा तैनात केल्या. या तोफा वाहून न्यायला ‘चिनूक’ या लढाऊ हेलिकॉप्टरचा वापर करण्यात आला. अरुणाचल प्रदेशात लष्कराने अमेरिकन बनावटीच्या सर्व वातावरणात वापरता येणारी वाहने, इस्त्रायली बनावटीची ७.६२ मिमी नेगेव्ह लाईट मशीन्स तैनात केली. गेल्या तीन वर्षात भारत-चीनचे सैन्य समोरासमोर उभे आहे. दोन्ही देशांचे ५० ते ६० हजार सैन्य प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर आहे. लष्करी व राजनैतिक पातळीवर चर्चा करून दोन्ही देशांनी काही भागातून सैन्य मागे घेतले.

सुसज्ज ताफा अन‌् टेहळणी

हवाई दलाच्या सी-१३० जे सुपर हर्क्युलस व सी-१७ ग्लोब मास्टर विमानाने ही यंत्रणा व सैन्य वाहून नेले. राफेल, मिग-२९ विमाने, हेलिकॉप्टर हवाई गस्तीसाठी तैनात केली होती. सुखोई व जग्वार या विमानांनी ५० किमीच्या परिसरात टेहळणी केली. त्यांनी चिनी सैन्यावर अचूक लक्ष ठेवले. हवाई दलाने हवाई संरक्षण यंत्रणा कार्यान्वित केली. यात रडार, भूपृष्ठावरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्र यंत्रणांचा समावेश होता. या सर्व मोहीमेतून हवाई दलाच्या क्षमतेचे दर्शन घडले, असे एका वरिष्ठ सूत्राने सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in