चिनी लष्कराने पूर्व लडाखमधील वादग्रस्त गोगरा-हॉटस्प्रिंगमधून ३ किमी लांब माघार घेतली आहे. ही महत्त्वाची माहिती ‘मॅक्सार टेक्नोलॉजी’ने जारी केलेल्या उपग्रह छायाचित्रांतून उघड झाली आहे. मे २०२० पासून दोन्ही देशांचे सैन्य या भागांतील पेट्रोलिंग पॉइंट-१५ जवळ एकमेकांपुढे ठाण मांडून बसले होते. यामुळे दोन्ही देशांत मोठा तणाव निर्माण झाला होता.
भारत-चीनच्या लष्करी अधिकाऱ्यांत १७ जुलै रोजी कोअर कमांडरस्तरीय चर्चेची १६ वी फेरी झाली. त्यात ८ सप्टेबर २०२२ रोजी वादग्रस्त ठिकाणावरून सैन्य मागे घेण्यावर एकमत झाले. याअंतर्गत दोन्ही देशांच्या लष्कराने सुनियोजितपणे पूर्व लडाखमधील गोगरा-हॉटस्प्रिंग्जमधून (पीपी-१५) माघार घेतली. एक वर्षापूर्वी १२ ऑगस्ट २०२१ रोजी ‘डिसएंगेजमेंट’पूर्वी गोगरा-हॉटस्प्रिंग्ज भागात चीनची एक लष्करी पोस्ट दिसून येत होती, असे सॅटेलाइट छायाचित्रांत दिसून येते; पण नव्या छायाचित्रात ती त्या ठिकाणी दिसत नाही. याप्रकरणी दोन्ही देशांतील सहमतीनुसार यापुढे या भागात दोन्ही देशांचे सैन्य पेट्रोलिंग करणार नाही.
यापूर्वीच्या सॅटेलाइट फोटोत चिनी लष्कराने एलएसीच्या अलिकडील भारतीय हद्दीत एक इमारत बांधल्याचे दिसून येत होते. चीनच्या २०२० च्या घुसखोरीपूर्वी भारतीय लष्कर या भागात नियमित गस्त घालत होते. दुसरीकडे,१५ सप्टेबर २०२२ च्या उपग्रहीय छायाचित्रांत ही इमारत त्या ठिकाणी दिसून येत नाही. त्यामुळे चीनने ही पोस्ट दुसऱ्या भागात हलवल्याचे दिसून येत आहे.