‘इस्रो’च्या जाहिरातीत चीनचा झेंडा, पंतप्रधान मोदी यांच्याकडून द्रमुकची कानउघाडणी

तामिळनाडूतील प्रमुख वृत्तपत्रांना राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) जाहिरातींमध्ये चीनच्या प्रक्षेपकाचा आणि झेंड्याचा वापर केल्यावरून...
‘इस्रो’च्या जाहिरातीत चीनचा झेंडा, पंतप्रधान मोदी यांच्याकडून द्रमुकची कानउघाडणी

चेन्नई : तामिळनाडूतील प्रमुख वृत्तपत्रांना राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) जाहिरातींमध्ये चीनच्या प्रक्षेपकाचा आणि झेंड्याचा वापर केल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्रविड मुन्नेत्र कळघम (द्रमुक) पक्षाची कानउघाडणी केली आहे. द्रमुकच्या खासदार के. कणिमोळी यांनी मात्र त्याकडे 'मानवी चूक' म्हणून फारसे लक्ष दिले नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी तामिळनाडूतील १७,३०० कोटी रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला. त्यात राज्यातील कुलशेखरपट्टीणम येथील इस्रोच्या दुसऱ्या प्रक्षेपण केंद्राचाही समावेश होता. इस्रोच्या या प्रक्षेपण केंद्राच्या जाहिराती तामिळनाडू सरकारकडून राज्यातील प्रमुख वर्तमानपत्रांना देण्यात आल्या होत्या. द्रमुकच्या मंत्री अनिता राधाकृष्णन यांच्यातर्फे या जाहिराती वर्तमानपत्रांकडे वितरीत झाल्या होत्या. त्यात भारतीय उपग्रह प्रक्षेपकाऐवजी चीनच्या रॉकेटचे छायाचित्र आणि चीनचा झेंडा वापरण्यात आला आहे. त्यावरून पंतप्रधान मोदी यांनी तिरुनेल्वेली येथील सभेत द्रमुकवर ताशेरे ओढले. विशेष म्हणजे या कार्यक्रमात मोदी यांच्यासह व्यासपीठावर द्रमुकच्या खासदार के. कणिमोळी आणि राज्याचे पीडब्ल्यूडी मंत्री ई. व्ही. वेळू हेदेखील उपस्थित होते.

मोदी म्हणाले की, द्रमुकला केंद्र सरकारच्या यशाचे काही कौतुक नाही. त्यांना केवळ केंद्राच्या योजनांचे खोटे श्रेय घ्यायचे आहे. हे लोक केवळ केंद्राच्या यशस्वी उपक्रमांवर आपले स्टीकर चिकटवतात. आता तर त्यांनी कहरच केला आहे. तामिळनाडूतील इस्रोच्या दुसऱ्या लाँचपॅडच्या जाहिरातीत चीनचे रॉकेट आणि झेंडा चिकटवला आहे. ते इस्रोची अंतराळ क्षेत्रातील प्रगती मान्य करण्यास तयार नाहीत.

यावर कणिमोळी यांनी उत्तर दिले की, संबंधित जाहिरात कोणी तयार केली आणि त्या व्यक्तीने ते चित्र कोठून घेतले, ते मला माहित नाही. ही मानवी चूक आहे आणि तसे नजरचुकीने घडले असावे. केंद्र सरकारने काही चीनला देशाचा शत्रू घोषित केलेले नाही. चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांना मोदी यांनी महाबलीपुरम येथे चर्चेला बोलावून त्यांचे स्वागत केल्याचे आपण पाहिले आहे. आता ते सत्य स्वीकारण्यास तयार नसल्याने विषयाला फाटे फोडत आहेत.

भाजपचे तामिळनाडू राज्य प्रमुख के. अण्णामलाई यांनीही द्रमुकवर जोरदार टीका केली. द्रमुकतर्फे जारी करण्यात आलेल्या जाहिरातीतून साफ दिसून येते की, त्यांना भारताच्या सार्वभौमत्त्वाची चाड नाही, असे ते म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in