
नवी दिल्ली: चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी हे दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या वार्षिक शिखर परिषदेसाठी चीन दौऱ्याच्या काही दिवस आधीच वांग यांचा भारत दौरा होत आहे.
दिल्ली विमानतळावर परराष्ट्र मंत्रालयाच्या पूर्व आशियाचा विभागाचे संयुक्त सचिव गौरंगलाल दास यांनी त्यांचे स्वागत केले.
सीमा प्रश्नावर विशेष प्रतिनिधींच्या संवादाचा पुढील टप्प्याची चर्चा करायला वांग भारतात आले आहेत. सीमा चर्चेसाठी वांग आणि डोवल हे नियुक्त विशेष प्रतिनिधी आहेत. भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकरही वांग यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा करणार आहेत.
२०२० मधील गलवान खोऱ्यातील रक्तरंजित संघर्षानंतर दोन्ही देशांमधील संबंध तणावग्रस्त झाले होते. त्या पार्श्वभूमीवर संबंध सुधारण्यासाठीचा भाग म्हणून वांग यांचा दौरा पाहिला जात आहे. वांग यांच्या भारत दौऱ्यात सीमावर्ती भागात कायमस्वरूपी शांतता आणि विश्वास निर्माण करण्यासाठी नवे आत्मविश्वासवर्धक उपाय योजण्यावर चर्चा होण्याची अपेक्षा आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
भारत-अमेरिका संबंधांमध्ये वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर वांग यांचा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंवरील शुल्क ५० टक्क्यांपर्यंत दुप्पट केले असून, रशियन खनिज तेल खरेदीसाठी अतिरिक्त २५ टक्के दंडही लावला आहे. सीमा प्रश्नावर संवादाचा नवा टप्पा मंगळवारी सकाळी ११ वाजता वांग आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार डोवल यांच्यात होणार आहे.