चीनचे संशोधन जहाज मालदीवकडे रवाना; हालचालींकडे भारतीय सेनादलांचे बारीक लक्ष

चीनने अशा प्रकारच्या संशोधनातून गोळा केलेली माहिती लष्करी कामासाठी वापरली आहे.
चीनचे संशोधन जहाज मालदीवकडे रवाना;  हालचालींकडे भारतीय सेनादलांचे बारीक लक्ष

माले : चीनचे वादग्रस्त संशोधन जहाज मालदीवच्या दिशेने रवाना झाले असून मालदीवने त्याला माले बंदरात नांगरण्याची परवानगी दिली आहे. या जहाजाकडून हेरगिरी केली जाण्याची शक्यता गृहित धरून भारतीय संरक्षण दलांनी त्याच्या हालचालींवर बारीक नजर ठेवली आहे.

चीनचे 'झियांग यांग हाँग ३' हे जहाज २२ जानेवारी रोजी इंडोनेशियाच्या जावा बेटाजवळ आढळले होते. ते मालदीवच्या दिशेने प्रवास करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर भारताकडून त्याबद्दल संशय व्यक्त केला गेला होता. हे जहाज मालदीवकडे सरकत असून ८ फेब्रुवारी रोजी मालदीवच्या माले बंदरात त्याला नांगरण्याची परवानगी दिली असल्याचे मालदीवच्या परराष्ट्र खात्यातर्फे मंगळवारी जाहीर करण्यात आले. या जहाजाला केवळ नांगरण्याची परवागनी दिली आहे. मालदीवच्या समुद्रात कोणतेही संशोधन करण्याची परवानगी दिलेली नाही, असेही मालदीवच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

चीनने अशा प्रकारच्या संशोधनातून गोळा केलेली माहिती लष्करी कामासाठी वापरली आहे. त्यामुळे भारताने त्यावर आक्षेप घेतला आहे. भारतीय सेनादले या जहाजाच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवून आहेत. चीनकडून गतवर्षी चीनचे अशाच प्रकारचे एक जहाज श्रीलंकेच्या बंदरात नांगरण्यात आले होते. त्यावर हेरगिरी करणारी आणि क्षेपणास्त्रांचा वेध घेणारी शक्तिशाली यंत्रणा बसवलेली होती. त्यावरही भारताने आक्षेप घेतला होता.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in