

पाटणा : मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) प्रक्रियेबाबत निवडणूक आयोगातील अंतर्गत मतभेदांच्या अहवालावरून जनतेच्या मनात निर्माण झालेले गैरसमज निवडणूक आयोगाने दूर करावेत, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी शुक्रवारी केले. एनडीएतील एक प्रमुख घटक पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्री असलेल्या चिराग पासवान यांनी सर्वप्रथम या प्रकरणाबाबत भाष्य केल्याने अन्य घटक पक्ष कोणती भूमिका घेतात त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
“सरकारचा एक भाग म्हणून एका घटनात्मक संस्थेचा बचाव करण्याचा माझा कोणताही हेतू नाही. तसेच विरोधी पक्षातील नेते राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांवर मी फारसा भर देत नाही, कारण विरोधी पक्ष नेहमीच राजकीय फायद्याची भूमिका घेतात. लोकांचा जर निवडणूक व्यवस्थेवरील विश्वास उडू लागला, तर ते लोकशाहीसाठी अत्यंत घातक ठरेल. त्यामुळे निवडणूक आयोगाने आपले स्पष्टीकरण अधिक ठामपणे समोर मांडले पाहिजे. सर्वसामान्य जनतेच्या मनातील भ्रम आणि शंका त्यांनी नक्कीच दूर केल्या पाहिजेत,” असे पासवान म्हणाले.