“व्हिडिओमध्ये मीच, त्यांनी जखमांवर मिरची पावडर चोळली”, पूंछच्या ‘त्या’ नागरिकांचा सुरक्षा दलांवर 'टॉर्चर'चा आरोप

“दुखापतीमुळे गेल्या शनिवारपासून झोपताही येत नाही. डोळे बंद करताच शरीरभर तीव्र वेदना होत असताना आणि छळाचे विचार मनात घोळत असताना कोण झोपू शकेल?”
“व्हिडिओमध्ये मीच, त्यांनी जखमांवर मिरची पावडर चोळली”, पूंछच्या ‘त्या’ नागरिकांचा सुरक्षा दलांवर 'टॉर्चर'चा आरोप
Published on

"आम्हाला बेदम मारहाण केली, विवस्त्र केले आणि बेशुद्ध होईपर्यंत 'जखमेवर मिरची पावडर' चोळण्यात आली”, असा दावा जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यातून सुरक्षा दलांनी कथितपणे ताब्यात घेतलेल्यांपैकी एक मोहम्मद अश्रफ (52) यांनी केला आहे.

हॉस्पिटलच्या बेडवरून ‘इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना अश्रफने, माझ्यासह इतर चार जणांना गेल्या आठवड्यात सुरक्षा दलांनी उचलले होते. त्यानंतर “त्यांनी आमचे कपडे काढले आणि आम्हाला लाठ्या आणि लोखंडी रॉडने मारहाण केली आणि आमच्या जखमांवर मिरची पावडर चोळली”, असे सांगितले.

गुरुवारी जम्मू-काश्मीरच्या पूंछमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात लष्कराचे चार जवान शहीद झाल्यानंतर या नागरिकांना कथितपणे उचलण्यात आले होते. चौकशीदरम्यान तीन नागरिकांचा कथितरित्या मृत्यू झाला आणि अश्रफसह पाच जणांना शनिवारी राजौरीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

गेल्या शनिवारपासून झोपताही येत नाही-

“व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणारी व्यक्ती मीच आहे, ज्याला लष्कराच्या जवानांनी लोखंडी रॉड आणि लाठ्याने मारहाण केली, असे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर केलेल्या व्हिडिओचा संदर्भ देत अश्रफनी सांगितले. “दुखापतीमुळे गेल्या शनिवारपासून झोपताही येत नाही. डोळे बंद करताच शरीरभर तीव्र वेदना होत असताना आणि छळाचे विचार मनात घोळत असताना कोण झोपू शकेल?” असेही अश्रफ म्हणाला. राजौरी जिल्ह्यातील थानामंडी भागातील हसबलोटे गावातील, अश्रफ यांनी 2007 पासून जम्मू आणि काश्मीरच्या पॉवर डेव्हलपमेंट डिपार्टमेंटमध्ये लाइनमन म्हणून दरमहा 9,330 रुपये पगारावर काम केले आहे. अश्रफ त्यांच्या तीन मुलांना - एक 18 वर्षांची मुलगी आणि 15 आणि 10 वर्षांची दोन मुले सांभाळतो. या वर्षी 23 मार्च रोजी त्यांच्या पत्नीचे निधन झाले.

उभं राहणं किंवा बसणंही जमत नाहीये-

अश्रफसोबत राजौरी रुग्णालयात दाखल करण्यात आलेले इतर चार जण फारुख अहमद (४५) आणि फजल हुसैन (५०), तसेच हुसैन यांचे पुतणे मोहम्मद बेताब (२५) आणि १५ वर्षांचे आहेत. ते सर्व थानामंडी भागातील आहेत. अश्रफ म्हणाले की, आमच्यापैकी कोणीही उभे राहू शकत नाही किंवा नीट बसू शकत नाही. “जेव्हा आम्हाला चाचण्यांसाठी हलवावे लागते किंवा शौचालयात जावे लागते तेव्हा ते (रुग्णालयातील कर्मचारी) आम्हाला व्हीलचेअरवर किंवा स्ट्रेचरवर घेऊन जातात,”

शुक्रवारी सकाळी 9.30 च्या सुमारास सुरक्षा दलांनी त्याला त्याच्या घरातून उचलल्याचा दावा अश्रफने केला. “ते मला डीकेजी (डेहरा की गली) जवळील मन्याल गली येथे घेऊन गेले जेथे त्यांचे सहकारी टाटा सुमोमध्ये फारुख अहमद यांच्यासोबत आधीच बसले होते. काही वेळाने मोहम्मद बेताब आणि त्याचा भाऊ यांनाही आणण्यात आले आणि ते सर्व आम्हाला त्यांच्या डीकेजी येथील कॅम्पमध्ये घेऊन गेले,”

शरीराच्या वरच्या भागावर एकही कातडी उरली नाही-

दहावीत शिकणाऱ्या १५ वर्षीय तरुणाला राजौरी रुग्णालयात त्याच खोलीत दाखल करण्यात आले आहे. त्याने असा दावा केला की चौकशीदरम्यान, सुरक्षा कर्मचार्‍यांनी अतिरेक्यांना जेवण दिले होते का असे विचारले आणि दहशतवादी हल्ल्याच्या आठ दिवस आधी त्याच्या घरी आयोजित केलेल्या मेजवानीचा संदर्भ दिला. “मी त्यांना सांगितले की माझा भाऊ बेताबच्या लग्नासाठी मेजवानी आयोजित करण्यात आली होती”, असे तो म्हणाला. या प्रश्नांनंतर इतरांसह आपल्यालाही मारहाण करण्यात आल्याचा आरोप त्याने केला.

बेताब हा मजूर असून तो काश्मीरमध्ये काम करतो आणि 15 डिसेंबर रोजी झालेल्या लग्नासाठी दोन महिन्यांपूर्वी घरी आला होता. “मी काश्मीरमध्ये कामावर जाण्यापूर्वी सुमारे एक महिना माझ्या पत्नीसोबत घरी राहण्याचा विचार केला होता,” असे तो म्हणाला. "माझ्या शरीराच्या वरच्या भागावर एकही कातडी उरलेली नाही," असा आरोपही त्याने केला. त्याने सांगितले की, दहशतवादी हल्ल्याच्या काही तासांनंतर गुरुवारी संध्याकाळी त्याला त्याचा भाऊ आणि काका फजल हुसैन यांच्यासह पोलीस दलाने त्यांच्या घरातून उचलले. दुसऱ्या दिवशी थानामंडी पोलिस ठाण्यात तक्रार करण्यास सांगून पोलिसांनी तीन तासांनंतर घरी परतण्याची परवानगी दिली. तथापि, शुक्रवारी सकाळी पोलीस स्टेशनला जाताना, “ लष्करी जवानांनी आम्हाला आमच्या मोबाईलवर कॉल केला आणि मन्याल गली येथे भेटायला सांगितले. तेथे, त्यांनी आम्हाला एका वाहनात बसवले आणि डीकेजी टॉप येथील त्यांच्या कँपमध्ये आणले,” असे बेताब म्हणाला.

दुसरीकडे, लष्कराच्या पीआरओने राजौरी रुग्णालयात दाखल असलेल्या पाचही जणांबद्दल कोणतीही माहिती देण्यास नकार दिला.

logo
marathi.freepressjournal.in