नवी दिल्ली : न्या. यशवंत वर्मा यांच्यावरील आरोपांची ज्या समितीने चौकशी करून अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर केला, त्या अहवालाला आव्हान देणारी याचिका न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांनी दाखल केली आहे. सरन्यायाधीश भूषण गवईं यांनी या याचिकेवरील सुनावणीतून माघार घेतली आहे. त्यामुळे आता या याचिकेच्या सुनावणीसाठी विशेष खंडपीठ स्थापन करण्यात येणार आहे.
न्या. वर्मा यांच्या दिल्लीतील निवासस्थानी आग लागल्याच्या घटनेनंतर मोठ्या प्रमाणात बेहिशेबी रोख रक्कम आढळून आली होती. मात्र, या प्रकरणात त्यांच्यावर झालेले आरोप न्या. वर्मा यांनी फेटाळून लावले होते. त्या प्रकरणाच्या अंतर्गत चौकशीसाठी तीन सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने सर्वोच्च न्यायालयाला आपला अहवालही सादर केला.
महाभियोग प्रक्रिया सुरू
न्या.वर्मा यांची या आरोपानंतर दिल्ली उच्च न्यायालयामधून अलाहाबाद उच्च न्यायालयात बदली करण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्याविरोधात महाभियोग मंजूर होऊन त्यांना पदावरून हटविण्यात येऊ शकते, अशी चर्चा मागील काही महिन्यांपासून सुरू आहे. न्या.वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोगाची प्रक्रिया औपचारिकपणे सुरू करण्यात आल्याचेही सांगितले जात आहे. सरन्यायाधीश गवई यांनी बुधवारी सांगितले की, न्या. वर्मा यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करण्यासाठी एक विशेष खंडपीठ स्थापन करण्यात येईल. त्यांच्या अधिकृत निवासस्थानातून मोठ्या प्रमाणात रोख रक्कम जप्त झाल्यानंतर त्यांच्यावर आरोप निश्चित करणाऱ्या तीन न्यायाधीशांच्या अंतर्गत समितीच्या निष्कर्षांना आव्हान देणारी ही याचिका आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणाबाबतच्या याआधी झालेल्या चर्चांमध्ये सरन्यायाधीश भूषण गवई हे आधी सहभागी असल्यामुळे आता या चर्चांमधून ते स्वतः दूर राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.