

पणजी : कायद्यात मध्यस्थी हा कायद्याचा कमकुवतपणा नाही तर कायद्याची सर्वोच्च उत्क्रांती आहे. मध्यस्थीला आता यशस्वी व कमी खर्चातील उपक्रम म्हणून सर्व पक्षकारांकडून स्वीकारले जात आहे, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी सांगितले.
दक्षिण गोव्यात बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या ‘मध्यस्थी’ विषयावरील राष्ट्रीय परिषद व परिसंवादाच्या उद्घाटन सत्रात बोलताना सूर्य कांत बोलत होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री प्रमोद सावंत, सर्वोच्च न्यायालयाचे न्या. जे. के. महेश्वरी, न्या. पी. एस. नरसिंह, न्या. अहसनुद्दीन अमानुल्लाह, न्या. एन. कोटिश्वर सिंग, न्या. उज्जल भुयान, न्या. प्रशांत कुमार मिश्रा, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती एस. चंद्रशेखर, बार कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मनन कुमार मिश्रा तसेच गोव्याचे महाधिवक्ता देविदास पंगम आदी मान्यवर उपस्थित होते.
सरन्यायाधीश म्हणाले की, जिल्हा न्यायालयांपासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत सर्व स्तरांवर अधिक संख्येने मध्यस्थांची गरज आहे. न्यायालयीन प्रलंबित प्रकरणे कमी करण्यात मदत करणारी मध्यस्थी ही कायद्याच्या कमकुवतपणाचे लक्षण नसून, उलट त्याची सर्वोच्च उत्क्रांती आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
न्यायाच्या शोधात न्यायालयात येणाऱ्या व्यक्तीसमोर मध्यस्थी, लवाद आणि अखेरीस खटला आदी वेगवेगळे मार्ग खुले असले पाहिजे. प्रत्येक तक्रारीच्या स्वरूपानुसार योग्य मार्ग उपलब्ध करून दिला गेला पाहिजे, असे त्यांनी सांगितले. मात्र, काही प्रकरणे मध्यस्थी किंवा लवादाद्वारे निकाली काढता येत नाहीत, हे मान्य करताना त्यांनी नमूद केले की अशा वादांचे न्याय्य निवारण करण्यासाठी न्यायव्यवस्था नेहमीच सज्ज असेल.
देशात सर्व स्तरांवर मध्यस्थी प्रभावीपणे राबवण्यासाठी अडीच लाखाहून अधिक प्रशिक्षित मध्यस्थांची आवश्यकता आहे. मध्यस्थी ही केवळ कला नाही, तर मध्यस्थाचे स्वभाववैशिष्ट्य, वर्तन, करुणा, उत्साह, बांधिलकी आणि समर्पण यांमुळेच प्रयत्न यशस्वी ठरतात, म्हणून प्रशिक्षण देताना अत्यंत काळजी घेणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.
न्यायालयातील प्रलंबित खटले कमी करण्यासाठी विवाहविषयक, व्यापारी तसेच मोटार अपघातांसह विविध वाद मध्यस्थीद्वारे निकाली काढण्याच्या उद्देशाने जुलै महिन्यात ‘मेडिएशन फॉर नेशन’ ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. तिचे परिणाम अपेक्षेपेक्षा अधिक आणि उत्साहवर्धक असल्याचे सरन्यायाधीशांनी सांगितले.
प्रत्येक पायरीवर प्रशिक्षित मध्यस्थ उपलब्ध झाल्यास आपली यशोगाथा अधिक उंचीवर जाईल आणि या क्षेत्रात लक्षणीय कामगिरी होईल,’ असे त्यांनी म्हटले.
मध्यस्थाला सांस्कृतिक संकेत समजणे आवश्यक
मध्यस्थी यशस्वी होण्यासाठी मध्यस्थाला केवळ स्थानिक किंवा प्रादेशिक भाषा नव्हे, तर त्या व्यक्तीच्या बोलीभाषा, अभिव्यक्ती आणि सांस्कृतिक संकेतही समजले पाहिजेत, असे त्यांनी अधोरेखित केले. सध्या सुमारे ३९ हजार प्रशिक्षित ‘मध्यस्थ’ उपलब्ध असले तरी ‘मागणी आणि पुरवठ्यात’ मोठी दरी असल्याचे त्यांनी नमूद केले.