

नवी दिल्ली : नीट पेपरफुटीप्रकरणी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी कोणत्याही परिस्थितीत मागे घेणार नसल्याचे कॉकरोच जनता पार्टीने पुन्हा एकवार स्पष्ट केले. ही मागणी मान्य होईपर्यंत जंतरमंतरवरील आंदोलन सुरूच राहील, असेही सीजेपीच्या नेत्यांनी जाहीर केले. केंद्र सरकारसोबत झालेल्या चर्चेनंतर याबाबत घोषणा करण्यात आली. दरम्यान, सीजेपीच्या मागण्या आम्ही ऐकून घेतल्या असून याबाबत उद्या पुन्हा बैठक होईल, असे केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांनी सांगितले.
सीजेपी आणि केंद्र सरकार यांच्यादरम्यान कॉन्स्टिट्यूशन क्लब येथे शुक्रवारी सुमारे दोन तास बैठक झाली. त्यावेळी राजीनाम्याच्या मागणीबाबत कोणतीही तडजोड होऊ शकत नाही, असे सीजेपीच्या प्रतिनिधींनी ठणकावले. या दोन्ही बाजूंमध्ये शनिवारी चर्चेची पुढची फेरी होणार आहे. आपण मंत्र्यांच्या घरी किंवा कार्यालयात बैठकीसाठी येणार नाही, असे सीजेपीच्या नेत्यांनी बजावले होते. त्यानुसार त्रयस्थ ठिकाणी ही बैठक झाली.
केंद्रीय मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह आणि सीजेपीच्यावतीने सौरव दास आणि आशुतोष रांका हे या बैठकीत सहभागी झाले होते. यावेळी प्रधान यांचा राजीनामा, नीट परीक्षा रद्द झाल्यामुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपयांची नुकसान भरपाई आणि आंदोलनात दाखल करण्यात आलेले सर्व गुन्हे मागे घेणे या मागण्यांचा सीजेपीच्या वतीने पुनरुच्चार करण्यात आला.
सरकारला दिलेल्या पत्रात संघटनेने म्हटले आहे की, देशभरातील समर्थक, सदस्य आणि जंतर-मंतरवरील आंदोलनकर्त्यांशी व्यापक चर्चा करूनच या मागण्यांवर एकमत झाले आहे. या पत्रात केंद्र सरकार, रॅपिड ॲक्शन फोर्स प्रमुख आणि दिल्ली पोलिस आयुक्तांनी २० जुलै रोजी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीमाराबद्दल सार्वजनिक माफी मागावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
तसेच परीक्षा सुधारणा संदर्भातील पाच कलमी मागणीपत्रावर सरकारने सकारात्मक भूमिका घ्यावी, कारण शिक्षण व्यवस्थेत व्यापक आणि संरचनात्मक सुधारणा घडवून आणण्यासाठी या उपाययोजना महत्त्वाच्या असल्याचे सीजेपीने म्हटले आहे.
सरकारचे केवळ आश्वासन
बैठकीनंतर केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांनी सरकारने आंदोलकांच्या सर्व मागण्या ऐकून घेतल्याचे सांगितले. "त्यांच्या मागण्यांवर सरकार विचार करून उत्तर देईल. शनिवारी पुन्हा बैठक होणार आहे," असे त्यांनी सांगितले.
मोदींचा राजीनामा मागावा लागेल - दीपके
या बैठकीबाबतची माहिती नंतर जंतरमंतरवर सौरव दास यांनी जाहीरपणे आंदोलकांना दिली. त्यावेळी आपली मागणी मान्य होण्याच्या दृष्टीने सकारात्मक गोष्टी घडत आहेत, असे ते म्हणाले. त्यावेळी धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा न दिल्यास आंदोलकांना नरेंद्र मोदींचा राजीनामा मागावा लागेल, असे अभिजित दीपके यांनी जाहीर केले. त्याला आंदोलकांनी जोरदार प्रतिसाद दिला.