

नवी दिल्ली : कॉकरोच जनता पक्षाचे नेते सौरभ दास आणि आशुतोष रांका यांना सोमवारी मंदीर मार्ग पोलीस ठाण्यात नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. त्यानंतर त्यांची न्यायालयीन कोठडी आणखी दोन दिवसांनी वाढवण्यात आली, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.
निषेध नोंदवण्यासाठी जंतरमंतरवर निर्बंध झुगारून प्रवेश केल्याप्रकरणी १३ ऑक्टोबर रोजी त्यांना पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. दरम्यान, आपल्या दोन सहकाऱ्यांना सोडविण्यासाठी जामीन प्रक्रियेत जाणीवपूर्वक दिरंगाई केली जात आहे, असा आरोप सीजेपीने केला आहे.
सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी 'एक्स'वर पोस्ट करत म्हटले आहे, न्यायालयीन प्रक्रियेत दिरंगाई करून आशुतोष आणि सौरभ यांच्या सुटकेला जाणीवपूर्वक उशीर केला जात आहे. सरकार अत्यंत गलिच्छ राजकारण करत त्यांच्या बेकायदेशीर अटकेचा काळ वाढवत आहे.
त्यांना तुरुंगात डांबून ठेवण्यासाठी कोणतेही कायदेशीर कारण उरलेले नाही, त्यामुळे ते केवळ वेळ काढूपणाचे धोरण अवलंबत आहेत, असा गंभीर आरोपही सीजेपीकडून करण्यात आला आहे. याशिवाय, पक्षाच्या नेत्यांच्या सुटकेसाठी सादर केलेले जामीनाचे हमीपत्रहीअत्यंत 'अस्पष्ट' कारणांवरून फेटाळण्यात आल्याचा दावा पक्षाने केला आहे.