ज्ञानेशविरोधात आंदोलनाचा भडका; CJP नेत्यांची विमानातच धरपकड; दिल्लीत ७,००० जण ताब्यात; ..तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार!

CJP Delhi Protest Against Gyanesh Kumar : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टीने शनिवारी जंतरमंतरवर सरकारचे बंदी आदेश धुडकावून जोरदार आंदोलन केले. देशभर सुरू असलेले हे आंदोलन दडपून टाकण्यासाठी पावले उचलणाऱ्या प्रशासनाने सीजेपीचे नेते अभिजीत दीपके, सौरभ दास आणि आशुतोष रांका यांना शनिवारी सकाळी नवी दिल्ली येथे उतरताच विमानातूनच ताब्यात घेतले.
ज्ञानेशविरोधात आंदोलनाचा भडका! दीपके, रांका, दास यांची विमानातच धरपकड; ममता, केजरीवालांसह चार माजी मुख्यमंत्र्यांना केले स्थानबद्ध, दिल्लीत सात हजार आंदोलक ताब्यात; ... तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा सीजेपीचा निर्धार
ज्ञानेशविरोधात आंदोलनाचा भडका! दीपके, रांका, दास यांची विमानातच धरपकड; ममता, केजरीवालांसह चार माजी मुख्यमंत्र्यांना केले स्थानबद्ध, दिल्लीत सात हजार आंदोलक ताब्यात; ... तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा सीजेपीचा निर्धार
Published on: 

नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टीने शनिवारी जंतरमंतरवर सरकारचे बंदी आदेश धुडकावून जोरदार आंदोलन केले. देशभर सुरू असलेले हे आंदोलन दडपून टाकण्यासाठी पावले उचलणाऱ्या प्रशासनाने सीजेपीचे नेते अभिजीत दीपके, सौरभ दास आणि आशुतोष रांका यांना शनिवारी सकाळी नवी दिल्ली येथे उतरताच विमानातूनच ताब्यात घेतले. दरम्यान, या आंदोलनाला मुंबई, पुणे यासह अनेक ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तसेच यापुढेही आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार सीजेपीने व्यक्त केला आहे.

त्याचप्रमाणे ध्रुव राठी यांच्यासह अनेक ज्येष्ठ राजकीय नेत्यांसह जवळपास ३००० हजारांहून अधिक जणांची धरपकड केली. त्यानंतर सीजेपीनेही आक्रमक भूमिका घेत आपल्या आंदोलनाची धार अधिक तीव्र करताना दीपके यांनी या कारवाईचे नेतृत्व अजिंक्य शिंदे यांच्याकडे सोपविले आणि त्याबाबतची घोषणा अगोदरच रेकॉर्ड केलेल्या व्हिडीओतून करण्यात आली. जंतरमंतर येथे जाताना वाटेत अडविण्यात आले तर तेच जंतरमंतर समजून आंदोलन सुरूच ठेवा, असे आवाहन शिंदे यांनी केले. गेल्या वेळी आंदोलन झाले तेव्हा देशाने एकत्र येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे गर्वहरण केले. यावेळी तसे होऊ नये यासाठी प्रशासनाने अनेक प्रतिबंधात्ममक उपाय योजले आहेत. त्यामुळे आता कितीही लोकांना ताब्यात घ्या, आम्ही उद्या पुन्हा येऊन आंदोलन करू, जोपर्यंत ज्ञानेशकुमार राजीनाम देत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा निर्धार शिंदे यांनी व्यक्त केला. दरम्यान या कारवाईवर संताप व्यक्त करीत हा प्रकार आणीबाणीहून अधिक वाईट असल्याचा आरोप विरोधकांनी केला.

सीजेपीचे आंदोलन यशस्वी होऊ नये यासाठी शुक्रवारपासूनच अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या, दिल्लीतील मेट्रो स्थानके बंद करून इंटरनेट सेवाही ठप्प करण्यात आली होती. त्यामुळे मिळेल त्या मार्गान जंतरमंतर येथे पोहोचण्याचा प्रयत्न आंदोलक करीत असतानाच दुपारी १ वाजण्याच्या सुमारास आकाशवाणी भवनाजवळ बॅरिकेड्स ओलांडून काही आंदोलकांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांवर दगडफेक केली, ज्यात सहा पोलीस कर्मचारी जखमी झाले. यानंतर पोलिसांनी त्वरित कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले. आंदोलनामुळे दिल्लीत ३०,००० हून अधिक पोलीस आणि निमलष्करी दल तैनात करण्यात आले होते. सुरक्षेचा भाग म्हणून ४५ मेट्रो स्टेशन बंद ठेवण्यात आली होती, तर सीमाभागांवर, रेल्वे स्थानकांवर आणि बस टर्मिनसवर कसून तपासणी करण्यात आली. जंतरमंतर परिसरात येणारे रस्ते बॅरिकेड्स लावून पूर्णपणे बंद करण्यात आले होते. काही रस्त्यांवर गाड्यांची जबरदस्तीने होणारी वाहतूक रोखण्यासाठी पोलिसांनी लोखंडी खिळेही (स्टील स्पाइक्स) लावले होते. निदर्शने करणाऱ्या छोट्या-छोट्या गटांना पोलिसांनी जंतरमंतर, कनॉट प्लेस आणि मिंटो ब्रिज परिसरातून ताब्यात घेतले.

ड्रोनद्वारे नजर

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवी दिल्ली परिसर आणि इतर जिल्ह्यांतून आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले. निदर्शक जंतरमंतरच्या दिशेने जाऊ नयेत म्हणून पोलीस ड्रोनच्या साहाय्याने लोकांच्या हालचालींवर बारीक नजर ठेवून होते. रेगल सिनेमा, मिंटो ब्रिज आणि आकाशवाणी भवन यांसारख्या प्रमुख ठिकाणांहून आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले. तसेच, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून राष्ट्रीय राजधानीच्या सर्व जिल्ह्यांमधून गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या ६०० हून अधिक लोकांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संभाव्य गर्दी जमा करणाऱ्यांवर किंवा इतरांना भडकवणाऱ्यांवर विशेष नजर ठेवण्यात येत असून, अशा संशयितांच्या घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

पोलिसांच्या या कारवाईवर दिपके म्हणाले की, आम्हाला गुन्हेगारांसारखी वागणूक दिली जात आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधींनीही अशी कारवाई केली नव्हती, असे सांगत त्यांनी याला "हुकूमशाही" म्हटले. केरळचे माजी मुख्यमंत्री पिनराई विजयन, त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री माणिक सरकार आणि सीपीएम खासदार जॉन ब्रिटास यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. सीजेपीच्या आंदोलनापूर्वीच यूट्यूबर ध्रुव राठी यालाही गुरुग्राममधील सेक्टर ५६ मधील त्याच्या निवासस्थानातून पोलिसांनी ताब्यात घेतले. परदेशात राहणारे राठी मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधातील या आंदोलनात सहभागी होण्यासाठी विशेषतः भारतात आले होते.

सीजेपीचे नेतृत्व अजिंक्य शिंदेंकडे

जंतरमंतरवर होणाऱ्या आंदोलनाचे नेतृत्व सीजेपीचे प्रमुख अजिंक्य शिंदे हे करतील, अशी घोषणा संस्थेचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी केली आहे. अभिजीत दीपके यांच्यासह सीजेपीच्या तीन नेत्यांना दिल्लीत ताब्यात घेण्यात आल्यानंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला. शनिवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वरील एका पोस्टमध्ये अभिजीत दीपके यांनी सांगितले की, अटक होण्याची शक्यता गृहीत धरून त्यांनी शुक्रवारी रात्रीच एक व्हिडीओ रेकॉर्ड करून ठेवला होता. हा व्हिडीओ पाहणाऱ्या समर्थकांनी अजिंक्य शिंदे यांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले.

दीपके यांच्या आजीचे निधन

अभिजीत दीपके यांच्या आजी सावित्रीबाई शंकरराव दीपके यांचे निधन झाले असून त्याबाबतची माहिती पोलिसांनी दीपके यांना दिली आहे. दीपके यांच्या आजीचे हिंगोली जिल्ह्यातील सर्तुक पिंपरी गावातील राहत्या घरी शनिवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर रविवारी सकाळी १० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, असेही सूत्रांनी सांगितले.

'आणीबाणीपेक्षाही वाईट' केजरीवाल

या आंदोलनाला उघड पाठिंबा देणारे आम आदमी पक्षाचे (आप) राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल हेही जंतरमंतरवर पोहोचू शकले नाहीत. कुटुंबासह आंदोलनात सहभागी होणार असल्याचे त्यांनी आधीच जाहीर केले होते. आंदोलनाला रोखण्यासाठी आणि नेत्यांना ताब्यात घेण्यासाठी दिल्ली पोलिसांनी केलेल्या कठोर सुरक्षा व्यवस्थेची तुलना केजरीवालांनी "आणीबाणीपेक्षा वाईट" अशी केली.

टीएमसी नेते ताब्यात ही सुपर आणीबाणी - ममता

तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना शनिवारी नवी दिल्लीत पोलिसांनी ताब्यात घेतले. आंदोलनात सहभागी होण्यासाठी जात असताना ही कारवाई करण्यात आली. दिल्लीतील परिस्थिती आता 'आणीबाणीच्याही पलीकडे' गेली आहे, असा संताप ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केला. ममता बॅनर्जी, टीएमसी सहसचिव डेरेक ओब्रायन आणि डोला सेन, राज्यसभेचे खासदार समिरुल इस्लाम, लोकसभेच्या खासदार प्रतिमा मंडल आणि माजी खासदार साकेत गोखले हे सर्वजण जंतरमंतरकडे जात होते. मात्र, पोलिसांनी त्यांना रोखल्यानंतर त्यांनी दक्षिण अव्हेन्यू येथील बसस्टॉपवरच धरणे आंदोलन सुरू केले. "ही आणीबाणीच्याही पलीकडची परिस्थिती असून आता ती 'सुपर आणीबाणी' झाली आहे. शांतता राखणे आणि संयम बाळगणे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, परंतु आज ते जे करत आहेत ते देशासाठी किंवा देशातील लोकांसाठी योग्य नाही," असेही बॅनर्जी म्हणाल्या.

सहा पोलीस कर्मचारी जखमी

निदर्शनांदरम्यान शनिवारी येथील आकाशवाणी जवळील इम्तियाज अली मार्गावर आंदोलकांनी बॅरिकेट्स तोडून सुरक्षा कर्मचाऱ्यांवर दगडफेक केली. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास २५ ते ३० आंदोलकांनी इम्तियाज अली मार्गावरील बॅरिकेट्स ओलांडून सुरक्षा कर्मचाऱ्यांवर दगडफेक केली. या घटनेत सहा पोलीस कर्मचारी जखमी झाले असून, काही आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

वकिलांना अटक व सुटका

सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनने (एससीबीए) शनिवारी वकिलांवर झालेला 'अतिरेकी बळाचा वापर' आणि वकिलांच्या अटकेबद्दल तीव्र निषेध व्यक्त केला आहे. तसेच या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करावा, अशी विनंती सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्याकडे केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, हे सर्व वकील जंतरमंतरकडे जात होते, जेथे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात निदर्शनांचे आवाहन करण्यात आले होते. या घडामोडीनंतर. ताब्यात घेण्यात आलेल्या सर्व वकिलांची सुटका करण्यात आली असल्याची माहिती एससीबीएच्या मानद सचिव अॅड. प्रज्ञा बघेल यांनी दिली.

आंदोलन म्हणजे अराजकतेचा भाजपचा दावा 'फ्लॉप शो'

दिल्लीत विरोधकांकडून पुकारण्यात आलेले आंदोलन हा 'फ्लॉप शो' ठरला असून, हा देश राजधानीला वेठीस धरण्याचा अयशस्वी प्रयत्न होता, असा गंभीर आरोप भारतीय जनता पक्षाने (भाजप) केला आहे. तसेच राहुल गांधी हे परदेशी शक्तींच्या हातचे खेळणे बनून देशात अराजकता पसरवत असल्याची टीका भाजपने केली. हा प्रकार म्हणजेच 'मॉबॉक्रेसी'चा (गुंडशाहीचा) पराभव आणि लोकशाहीचा विजय असल्याचे भाजप नेत्यांनी म्हटले आहे.

जंतरमंतरवर जाणाऱ्या शेकडो तरुणांना आणि काही राजकीय नेत्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर भाजप मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत खासदार संबित पात्रा यांनी राहुल गांधींवर कडाडून टीका केली. राहुल गांधींनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भेटीनंतर केलेल्या 'बेसलेस' (आधारहीन) वक्तव्याचा संदर्भ देत पात्रा म्हणाले की, यावरून राहुल गांधी हे लोकसभेतील विरोधी पक्षनेते पदासाठी अजिबात पात्र नाहीत हे सिद्ध झाले आहे.

इंडिया आघाडीचा सोमवारी दिल्लीत मोर्चा

नवी दिल्ली/आलप्पुषा : लोकशाही आणि मतदानाचा अधिकार सुरक्षित ठेवण्याच्या लढ्याचा एक भाग म्हणून इंडिया आघाडी येत्या आगामी सोमवारी दिल्लीत एक मोठे आंदोलन करणार आहे, अशी घोषणा काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी केली.

संयुक्त राष्ट्राने व्यक्त केली चिंता

रोजी दिल्लीत मोठ्या प्रमाणावर झालेल्या आंदोलनादरम्यान शेकडो लोकांना ताब्यात घेतल्याबद्दल संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार कार्यालयाने चिंता व्यक्त केली आहे. तसेच, भारतीय अधिकाऱ्यांनी शांततापूर्ण आंदोलनाच्या अधिकाराचा आदर करावा आणि ज्यांना मनमानी पद्धतीने ताब्यात घेण्यात आले आहे, त्यांची तातडीने सुटका करावी, असे आवाहन युनोने केले आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in