लेखी आश्वासन न मिळाल्यास पुन्हा आंदोलन; गुन्हे मागे घेण्यावरून CJP चा इशारा

आंदोलक आणि आयोजकांवरील गुन्हे (एफआयआर) मागे घेण्याबाबत केंद्र सरकारकडून दिल्या जाणाऱ्या वचनबद्धतेच्या लेखी कराराची वाट पाहत असल्याचे 'कॉकरोच जनता पार्टी'ने (सीजेपी) सोमवारी सांगितले. मंगळवारपर्यंत हे लेखी आश्वासन न मिळाल्यास पुन्हा आंदोलन सुरू करण्यास भाग पाडले जाईल, असा थेट इशारा पक्षाने दिला आहे.
लेखी आश्वासन न मिळाल्यास पुन्हा आंदोलन; गुन्हे मागे घेण्यावरून CJP चा इशारा
लेखी आश्वासन न मिळाल्यास पुन्हा आंदोलन; गुन्हे मागे घेण्यावरून CJP चा इशाराX | PTI
Published on

नवी दिल्ली : आंदोलक आणि आयोजकांवरील गुन्हे (एफआयआर) मागे घेण्याबाबत केंद्र सरकारकडून दिल्या जाणाऱ्या वचनबद्धतेच्या लेखी कराराची वाट पाहत असल्याचे 'कॉकरोच जनता पार्टी'ने (सीजेपी) सोमवारी सांगितले. मंगळवारपर्यंत हे लेखी आश्वासन न मिळाल्यास पुन्हा आंदोलन सुरू करण्यास भाग पाडले जाईल, असा थेट इशारा पक्षाने दिला आहे.

पत्रकार परिषदेला संबोधित करताना सीजेपीचे राष्ट्रीय प्रवक्ते आशुतोष रांका म्हणाले की, जंतरमंतर येथील ३६ दिवसांचे आंदोलन मागे घेण्यापूर्वी सरकारसोबत झालेल्या तिसऱ्या फेरीच्या चर्चेत या मुद्द्यावर सविस्तर चर्चा झाली होती. तिसऱ्या फेरीच्या चर्चेदरम्यान देशभरातील आंदोलक आणि आयोजकांवर नोंदवलेले सर्व एफआयआर मागे घेतले जातील आणि भविष्यात कोणत्याही आयोजक किंवा आंदोलकावर नवा गुन्हा नोंदवला जाणार नाही, यावर सहमती झाली होती, असे रांका यांनी स्पष्ट केले.

कराराची प्रतीक्षा

ते पुढे म्हणाले की, सीजेपीने केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्याकडे कराराचा मसुदा सुपूर्द केला होता. कायदेशीर सल्लामसलतीनंतर सरकार मंगळवारपर्यंत लेखी करार सादर करेल, असे दोन्ही बाजूंकडून मान्य करण्यात आले होते. आम्ही सरकारकडून लेखी कराराची वाट पाहत आहोत. ज्येष्ठ केंद्रीय मंत्री या कराराचा मान राखतील, सर्व एफआयआर मागे घेतले जातील, कोणत्याही आंदोलकाची किंवा आयोजकाची पिळवणूक केली जाणार नाही आणि भविष्यात कोणतेही गुन्हे दाखल केले जाणार नाहीत, अशी आम्हाला आशा आहे, असे रांका म्हणाले.

...तर पुन्हा रस्त्यावर

मंगळवारपर्यंत लेखी करार न मिळाल्यास आणि आंदोलनादरम्यान अटक केलेल्यांना मुक्त न केल्यास सीजेपी पुन्हा रस्त्यावर उतरेल, असा इशारा त्यांनी दिला. सीजेपीचे मुख्य प्रवक्ते सौरव दास म्हणाले की, सरकारने मुख्य मागण्या मान्य केल्यावर आणि इतर मुद्द्यांवर ठरलेल्या वेळेत कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर सीजेपीने "सद्भावनेने" आंदोलन स्थगित केले होते.

सिब्बल यांची कायदेशीर मदत आणि एक कोटी

  • राज्यसभेचे खासदार आणि ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी सीजेपी आणि विद्यार्थी आंदोलकांना कायदेशीर मदत करण्याची आणि त्यांच्या लढ्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली. बिहार, आसाम, बंगाल, महाराष्ट्रात विद्यार्थी आंदोलकांना लक्ष्य केल्याच्या तक्रारी असून तिथे आमचे वकील त्यांच्यासाठी उभे राहतील असे त्यांनी नमूद केले.

  • कॉकरोच जनता पार्टीचे नेते अभिजित दीपके यांनी रविवारी सिब्बल यांची भेट घेतली होती. आजच्या घोषणेनंतर कॉकरोच पार्टीने सिब्बल यांचे आभार मानले.

  • दिल्लीतील आंदोलन २५ जुलै रोजी संपल्यानंतर केंद्र सरकार वैयक्तिक पातळीवर आंदोलकांना लक्ष्य करणे सुरू करेल, अशी भीती सीजेपीने व्यक्त केली होती. यापूर्वी अनेक मोठ्या आंदोलनामधील लोकांना खोट्या प्रकरणांमध्ये अडकवण्यात आले होते. हा पूर्वानुभव पाहून सीजेपी सध्या देशभरातील विद्यार्थ्यांसाठी कायदेशीर आणि वैद्यकीय मदत करत आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in