जेएनयूत निवडणुकीवरून हाणामारी; काही विद्यार्थी जखमी, कठोर कारवाईचा कुलगुरूंचा इशारा

गुरुवारी रात्री उशिरा विद्यापीठाच्या स्कूल ऑफ लँग्वेजेस इमारतीत हा हिंसाचार झाला.
जेएनयूत निवडणुकीवरून हाणामारी; काही विद्यार्थी जखमी, कठोर कारवाईचा कुलगुरूंचा इशारा

नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील निवडणूक समिती सदस्यांच्या निवडीवरून गुरुवारी रात्री उशिरा दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीत काही विद्यार्थी जखमी झाले. या संबंधात कुलगुरू संतश्री डी. पंडित यांनी राजकीय संलग्नतेची पर्वा न करता संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असे शुक्रवारी स्पष्टपणे सांगितले.

गुरुवारी रात्री उशिरा विद्यापीठाच्या स्कूल ऑफ लँग्वेजेस इमारतीत हा हिंसाचार झाला. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि डाव्या-समर्थित गटातील विद्यार्थ्यांनी एकमेकांविरोधात पोलिसांत तक्रारी केल्या आहेत. वसंत कुंज उत्तर पोलीस ठाण्यात या तक्रारींची नोंद केली गेली आहे. विद्यापीठाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, काही विद्यार्थ्यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांनी सांगितले की, विद्यापीठ परिसरात पहाटे १.१५ वा. चकमक झाल्याची माहिती मिळाली. त्यात किमान चार विद्यार्थी जखमी झाले असून दोन्ही बाजूंकडून अनेक तक्रारी केल्या गेल्या आहेत.

विद्यापीठाच्या कुलगुरू संतश्री डी. पंडित यांनी सांगितले की, प्रशासन याप्रकरणी लक्ष घालून कठोर कारवाई करील. जेएनयूच्या विद्यार्थी संघ निवडणुका विद्यार्थ्यांद्वारे आयोजित केल्या जातात. ही शांततापूर्ण लोकशाही प्रक्रिया आहे याची खात्री करणे ही त्यांची जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांच्या संघटनेच्या कोणत्याही तक्रारी आयएचएद्वारे याची पाहणी केली जाईल. दोषी आढळलेल्यांवर कठोर कारवाई केली जाईल.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in