लोकसभेत महाराष्ट्रातील खासदारांमध्ये खडाजंगी

गेल्या अडीच वर्षांत महाराष्ट्रात एका वेगळ्याच विक्रमाची नोंद झाली
लोकसभेत महाराष्ट्रातील खासदारांमध्ये खडाजंगी

नवी दिल्ली : लोकसभेत मंगळवारी अविश्वास ठरावावरील भाषणादरम्यान महाराष्ट्रातील खासदार श्रीकांत शिंदे आणि अरविंद सावंत यांच्यात जुंपली. यामुळे शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात खडाजंगी पाहायला मिळाली. खासदार श्रीकांत शिंदे यांनी अडीच वर्षांच्या कार्यकाळावर बोचरी टीका केली. तसेच तेव्हा नेमके काय घडले याचा पाढा वाचला. ही टीका जिव्हारी लागल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. दोन्ही खासदारांच्या वादात मंत्री नारायण राणे यांनीही उडी घेतली आणि अरविंद सावंत यांना शिवसेनाचा इतिहास काय होता? काय झाले आहे? याबाबत सुनावले.

श्रीकांत शिंदे यांनी ठाकरे सरकारवर टीका करताना त्यांच्या राज्य कारभारावेळी सर्व विकासाच्या कामावर बंदी आणण्याचे काम त्यांनी केले, असे म्हटले. कारण मुख्यमंत्री घराच्या बाहेर निघतच नव्हते. म्हणूनच्या त्यांना विकासाची आवश्यकताच नव्हती. गेल्या अडीच वर्षांत महाराष्ट्रात एका वेगळ्याच विक्रमाची नोंद झाली. गेल्या अडीच वर्षांत फक्त अडीच दिवस मंत्रालयात जाण्याचा गिनिज बुक ऑफ रेकॉर्ड मुख्यमंत्र्यांनी केला होता”, अशी बोचरी टीका खासदार श्रीकांत शिंदे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटावर केली. यावर चिडलेल्या अरविंद सावंत यांनी श्रीकांत शिंदे यांना प्रत्युत्तर देताना अनुभवाचा दाखला दिला. ते म्हणाले की, आम्ही भाषण ऐकत होतो. १९५३ साली काय झाले? १९७३ साली काय झाले? तेव्हा तुझा जन्मही झाला नव्हता. ते आम्हाला हिंदुत्व शिकवत आहेत. हिंदुत्वात पळपुटे नसतात. पळपुटे काय बोलणार? बाळासाहेब काय होते यांना काय माहिती? खोटारडे लोक खरे बोलण्याचा प्रयत्न करतात. खोटे बोलून सत्य लपवण्याचा प्रयत्न करत आहेत. ईडीला घाबरून गेलेले आता हे लोक बोलणार हिंदुत्वाबाबत.. वॉशिंग मशीनमध्ये गेले आहेत. महाराष्ट्रातील सरकारही घटनाबाह्य आहे. मुख्यमंत्र्यांपासून सर्वच अपात्र होणार आहेत,” असे खासदार अरविंद सावंत यांनी प्रत्युत्तर दिले.

यानंतर नारायण राणे यांनी वादात उडी घेतली. ते म्हणाले की, अरविंद सावंत यांचे भाषण ऐकताना मला असे वाटत होते की मी दिल्लीत नाही तर महाराष्ट्र विधानसभेत बसलो आहे. हिंदुत्व आणि खऱ्या शिवसेनेबाबत सांगत आहे, पण हा शिवसेनेत कधी आला. मी १९६६ चा शिवसैनिक आहे. मी जेव्हा शिवसेना सोडली तेव्हा २२० लोकांनी विरोध केला होता. आता काही लोकच वाचले आहेत. हे वाघ नाहीत तर मांजर आहेत. ते संपले आहेत. त्यांची पंतप्रधानांवर बोलण्याची लायकी नाही,” असे जोरदार प्रत्युत्तर केंद्रीय मंत्री नारायण यांनी विरोधात असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या खासदारांना दिले.

logo
marathi.freepressjournal.in