जम्मू-काश्मीर विधानसभेत हाणामारी; भाजपचे तीन आमदार जखमी

‘कलम ३७०’ मागे घेण्यावरून जम्मू-काश्मीर विधानसभेत गुरुवारी प्रचंड गोंधळ झाला. विधानसभेत सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि विरोधकांमध्ये हाणामारी झाली. यावेळी झालेल्या मारहाणीत भाजपचे तीन आमदार जखमी झाले.
जम्मू-काश्मीर विधानसभेत हाणामारी; भाजपचे तीन आमदार जखमी
Published on

श्रीनगर : ‘कलम ३७०’ मागे घेण्यावरून जम्मू-काश्मीर विधानसभेत गुरुवारी प्रचंड गोंधळ झाला. विधानसभेत सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि विरोधकांमध्ये हाणामारी झाली. यावेळी झालेल्या मारहाणीत भाजपचे तीन आमदार जखमी झाले. हा गोंधळ वाढल्याने सभागृहाचे कामकाज काही काळासाठी तहकूब करण्यात आले.

आमदार अभियंता रशीद यांचे भाऊ खुर्शीद अहमद शेख यांनी ‘कलम ३७०’चे बॅनर सभागृहात दाखवले. त्यानंतर पक्षाचे आमदार आणि विरोधकांमध्ये बाचाबाची सुरू झाली. खुर्शीद अहमद शेख यांनी बॅनर दाखविल्यानंतर विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुनील शर्मा यांनी विरोध केला. त्यानंतर सत्ताधारी-विरोधी आमदारांमध्ये हाणामारी झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मार्शलला हस्तक्षेप करावा लागला.

खुर्शीद अहमद शेख हे अवामी इत्तेहाद पक्षाचे आमदार आहेत. पीडीपीने जम्मू-काश्मीर विधानसभेत ‘कलम ३७०’ आणि ‘३५ ए’ पुनर्स्थापित करण्याचा प्रस्ताव मांडला होता. त्यामुळे विधानसभेतील परिस्थिती अतिशय तणावपूर्ण बनली. विधानसभेत गोंधळ घालणाऱ्या काही विरोधी आमदारांना मार्शल्सनी बाहेरचा रस्ता दाखवला. यानंतर सभागृहाचे कामकाज काही काळासाठी तहकूब करण्यात आले. भाजप नेत्या निर्मला सिंह म्हणाल्या की, ३७० इतिहास बनला आहे. ओमर अब्दुल्ला सरकार पाकिस्तानचे मनोबल वाढवत आहे. त्याचवेळी भाजप नेते रवींद्र रैना म्हणाले की, ३७० ने जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद, फुटीरतावाद आणि पाकिस्तानी मानसिकतेला जन्म दिला. अशा स्थितीत विधानसभेत ३७० चा प्रस्ताव असंवैधानिक पद्धतीने आणणे, तो घाईघाईने, गुपचूपपणे मांडणे यावरून नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसला जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती पुन्हा बिघडवायची आहे, हेच दिसून येते.

दहशतवाद्यांचा अजेंडा पूर्ण करण्याचा कट

काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा अजेंडा पूर्ण करण्याचा कट रचत आहेत. पण भाजप विधानसभेच्या आत आणि बाहेर काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सच्या अजेंड्याला विरोध करेल. हा अजेंडा इथे चालू देणार नाही. सहा वर्षांनंतर पहिल्यांदाच जम्मू-काश्मीर विधानसभेचे अधिवेशन होत आहे. हे पाच दिवसीय अधिवेशन सोमवारपासून सुरू झाले.

logo
marathi.freepressjournal.in