
नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून बुधवारी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये सदस्यांनी एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप केले, त्याचे तीव्र पडसाद गुरुवारी संसदेबाहेर उमटले. सत्तारूढ आणि विरोधी पक्षांच्या सदस्यांनी एकमेकांना धक्काबुक्की करीत संसद संकुलाचा आखाडाच केला. धक्काबुक्कीत भाजपचे दोन खासदार जखमी झाले असून भाजपने राहुल गांधी यांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप केला, तर काँग्रेसने भाजप खासदारांनी खर्गेंना धक्काबुक्की केल्याचा आरोप केला.
संसद संकुलात झालेल्या धक्काबुक्कीत भाजपचे प्रताप चंद्र सारंगी आणि मुकेश राजपूत हे दोन खासदार जखमी झाले असून त्यांना राम मनोहर लोहिया रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. भाजपने संसदेची प्रतिष्ठा कमी केल्याचा आरोप काँग्रेसने केला. भाजपच्या खासदारांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना ढकलले आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना धक्काबुक्की केली, असा आरोप काँग्रेसने केला असून भाजपने तो साफ फेटाळला आहे.
राहुल काय म्हणाले
या सर्व प्रकाराबाबात राहुल गांधी म्हणाले की, आम्ही मकरद्वाराने संसदेत जात होतो. त्यावेळी भाजपचे काही खासदार तेथे उभे होते. त्यांनी आम्हाला आत जाण्यापासून अडवण्याचा प्रयत्न केला आणि धक्काबुक्की केली. हे लोक संविधानावर आक्रमण करत आहेत, तसेच बाबासाहेब आंबेडकरांचा अपमानही भाजपने केला आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. यानंतर राहुल गांधी म्हणाले, मी धक्काबुक्की केलेली नाही, तर मलाच धक्काबुक्की करण्यात आली. आम्हाला भाजपच्या खासदारांनी संसदेत जाण्यापासून अडवले. आम्हाला धक्काबुक्की करण्यात आली आहे, आम्ही पायऱ्यांवर उभे होतो. जे काही घडले आहे ते कॅमेऱ्यात कैद झाले आहे. पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंना धक्काबुक्की करण्यात आली. धक्काबुक्की करून काहीही साध्य होणार नाही. भाजपचे खासदार आम्हाला संसदेत जाण्यापासून रोखू शकत नाहीत, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
राहुल गांधींनी धक्काबुक्की केल्याचा सारंगी यांचा आरोप
दरम्यान, भाजपचे खासदार प्रताप चंद्र सारंगी यांनी, आपल्याला राहुल गांधी यांनी धक्का देऊन पाडल्याचा आरोप केला. राहुल गांधींनी धक्का दिल्याने डोक्याला मार लागला, असे सारंगी यांनी म्हटले आहे. मी पायऱ्यांवर उभा होतो, त्यावेळी राहुल गांधी यांनी एकाला धक्का दिला. ते माझ्या अंगावर पडले आणि मी जखमी झालो, असे सारंगी यांनी म्हटले आहे. या प्रकरणाची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींना देण्यात आली आहे. या घटनेत खासदार प्रताप चंद्र सारंगी आणि खासदार मुकेश राजपूत जखमी झाले आहेत. या दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
काँग्रेसची अध्यक्षांकडे तक्रार
काँग्रेसच्या खासदारांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन त्यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. राहुल गांधी यांच्याशी असभ्य वर्तन करण्यात आले आणि त्यांना संसदेत जाण्यापासून रोखण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. खर्गे यांनी बिर्ला यांना पत्र लिहिले असून त्यामध्ये म्हटले आहे की, आपल्याला धक्का देण्यात आला. त्यामुळे आपण जमिनीवर पडलो आणि शस्त्रक्रिया झालेल्या गुडघ्याला दुखापत झाली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी खर्गे यांनी केली आहे. हा वैयक्तिक हल्ला नाही तर राज्यसभेतील विरोधी पक्षनेत्यावर करण्यात आलेला हल्ला आहे, असे खर्गे यांनी म्हटले आहे.
पोलीस ठाण्यात काँग्रेस-भाजपच्या परस्परांविरुद्ध तक्रारी
या धक्काबुक्कीच्या घटनेप्रकरणी भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी संसद मार्ग पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या आहेत. भाजपने आपल्या तक्रारीत राहुल गांधींवर हल्ला व खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. गांधी यांनी केलेल्या हाणामारीत दोन खासदार पडले आणि जखमी झाल्याची तक्रार खुनाच्या प्रयत्नाच्या कलमांतर्गत दाखल करण्यात आली आहे. काँग्रेसनेही भाजप खासदारांविरुद्ध हल्ला, धक्काबुक्कीप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.