हिमाचल प्रदेशात ढगफुटी; १९ जणांचा बळी

मागील २४ तासांत चंबाच्या भटियात ३, मंडीत १० व कांगडात दोन जणांचा बळी गेला आहे.
हिमाचल प्रदेशात ढगफुटी; १९ जणांचा बळी

हिमाचल प्रदेशात गेल्या २४ तासांत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूर आला असून, काही ठिकाणी ढगफुटीसारख्या घटना घडल्या आहेत. तसेच दरडीही कोसळल्या आहेत. कांगडा, मंडी व चंबा जिल्ह्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. आतापर्यंत पावसाने १९ जणांचा बळी घेतला असून पाच जण बेपत्ता आहेत. धरमशाला येथे पावसाने गेल्या ६४ वर्षांचा विक्रम मोडीत काढला आहे.

मागील २४ तासांत चंबाच्या भटियात ३, मंडीत १० व कांगडात दोन जणांचा बळी गेला आहे. यात एका नऊ वर्षीय बालिकेचाही समावेश आहे. या मुलीचा शाहपूर येथील एक घर कोसळल्यामुळे मृत्यू झाला आहे. चंबा व मंडी जिल्ह्यात अनेक जण बेपत्ता असल्याचेही वृत्त आहे. हमीरपूरमधील १० ते १२ घरांना जलसमाधी मिळाली; पण सुदैवाने यात अडकलेल्या १९ जणांची सुखरूप सुटका करण्यात आली.

मंडीच्या गोहरमध्ये दरड कोसळल्यामुळे काशन पंचायतीच्या जडोन गावातील एकाच कुटुंबातील आठ जण ढिगाऱ्याखाली दबले गेले आहेत. या ठिकाणी युद्धपातळीवर मदतकार्य सुरू आहे. मंडीच्या कटौला येथील बागी नाल्यात एक कार व त्यातील सहा जण वाहून गेले. यातील १५ वर्षीय मुलीचा मृतदेह आढळला आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in