महाराष्ट्र - कर्नाटक सीमावादावर कर्नाटक सरकारची भूमिका ही अतंत्य वादग्रस्त ठरते आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी दिलेल्या सूचनेनंतरही मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी अनेकदा या वादावर वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. अशामध्ये आता या सीमाप्रश्नाच्या विरोधात मांडलेला ठराव कर्नाटकच्या विधानसभेने एकमताने मंजूर केला. यामुळे आता महाराष्ट्रातून सर्व स्तरातून यावर टीका होत आहे. मुख्यमंत्री बोम्मई यांनी मांडलेल्या ठरावाला सर्वपक्षीय पाठिंबा देण्यात आला. यावर ते म्हणाले की, "महाराष्ट्राला एकही इंच जागा देणार नाही. कर्नाटककडे कोणीही वक्रदृष्टीने पाहिल्यास कोणत्याही गोष्टीची पर्वा केली जाणार नाही," असा पुनरुच्चार त्यांनी केला.
महाराष्ट्रातून नेते बेळगावात येऊन वातावरण बिघडवत असल्याची टीका मुख्यमंत्री बोम्मई यांनी केली. ते म्हणाले, "राज्याच्या सीमा बदलण्याचा अधिकार फक्त संसदेला आहे. राज्याची पुनर्रचना होताना जनतेच्या भावना जाणून घेऊन राज्यांची निर्मिती करण्यात आली. महाराष्ट्र एकीकरण समितीची स्थापना ज्या उद्देशाने करण्यात आली होती तो उद्देश बाजूला गेला. समितीला कोणाचाही पाठिंबा उरलेला नाही. सर्वोच्च न्यायालयात कर्नाटकाची बाजू समर्थपणे मांडण्यास आपण तयार आहोत, कर्नाटकची बाजू भक्कम असेल," असा दावा त्यांनी यावेळी केला.