नववर्षाची गुडन्यूज! १ जानेवारीपासून CNG, PNG होणार स्वस्त; सर्वसामान्यांना महागाईतून मोठा दिलासा

नव्या वर्षाच्या (२०२६) सुरुवातीलाच सर्वसामान्यांना महागाईतून मोठा दिलासा मिळणार आहे. केंद्र सरकारने सीएनजी आणि घरगुती पीएनजीच्या दरात कपात करण्याची तयारी केली आहे. ‘पेट्रोलियम आणि नॅचरल गॅस रेग्युलेटरी बोर्डा’ने (पीएनजीआरबी) गॅस वाहतुकीच्या शुल्कात मोठी कपात जाहीर केली असून, याचे नवे दर १ जानेवारी २०२६ पासून लागू होणार आहेत.
नववर्षाची गुडन्यूज! १ जानेवारीपासून CNG, PNG होणार स्वस्त; सर्वसामान्यांना महागाईतून मोठा दिलासा
Published on

नवी दिल्ली : नव्या वर्षाच्या (२०२६) सुरुवातीलाच सर्वसामान्यांना महागाईतून मोठा दिलासा मिळणार आहे. केंद्र सरकारने सीएनजी आणि घरगुती पीएनजीच्या दरात कपात करण्याची तयारी केली आहे. ‘पेट्रोलियम आणि नॅचरल गॅस रेग्युलेटरी बोर्डा’ने (पीएनजीआरबी) गॅस वाहतुकीच्या शुल्कात मोठी कपात जाहीर केली असून, याचे नवे दर १ जानेवारी २०२६ पासून लागू होणार आहेत.

‘पीएनजीआरबी’ने घेतलेल्या निर्णयानुसार, गॅस वाहतुकीसाठी आता 'युनिफाइड टॅरिफ' प्रणाली लागू केली जाईल. यामुळे वाहतुकीचा खर्च कमी होऊन थेट ग्राहकांना फायदा मिळणार आहे. यामुळे सीएनजी प्रति किलो १.२५ ते २.५० रुपयांपर्यंत स्वस्त होण्याची शक्यता आहे. तर पीएनजी घरगुती वापराच्या पाईप गॅसच्या दरात प्रति युनिट ०.९० ते १.८० रुपयांची कपात होण्याची शक्यता आहे.

तीनऐवजी दोन झोन

सरकारने नैसर्गिक वायू वाहतुकीसाठी तीन झोनऐवजी आता केवळ दोन झोनमध्ये विभाजन केले आहे. यापूर्वी ३०० किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर गॅस पाठवण्यासाठी जास्त शुल्क द्यावे लागत होते. मात्र, नव्या नियमानुसार ३०० किमी पेक्षा जास्त अंतरासाठीचे शुल्क ५० टक्क्यांनी कमी होईल. या निर्णयाचा फायदा देशभरातील ३१२ भौगोलिक क्षेत्रांमधील ४० शहरांतील गॅस वितरण कंपन्यांना होणार आहे.

कोणाला फायदा?

या निर्णयामुळे मुंबईत 'महानगर गॅस', दिल्लीत 'इंद्रप्रस्थ गॅस' आणि अदानी टोटल गॅस यांसारख्या कंपन्यांना होणारा गॅस पुरवठा स्वस्त होईल. याचा थेट लाभ रिक्षा-टॅक्सीचालक, खासगी वाहनचालक आणि स्वयंपाकघरात पाईप गॅस वापरणाऱ्या गृहिणींना मिळणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in