CNG Price Hike: ४ ते ६ रुपयांनी सीएनजी महागण्याची शक्यता; 'हे' आहे कारण!

महागाईने सर्वसामान्य माणसांचे कंबरडे मोडलेले असतानाच ऐन दिवाळीच्या तोंडावर सीएनजी गॅस महागण्याची दाट शक्यता आहे.
CNG Price Hike: ४ ते ६ रुपयांनी सीएनजी महागण्याची शक्यता; 'हे' आहे कारण!
Published on

नवी दिल्ली : महागाईने सर्वसामान्य माणसांचे कंबरडे मोडलेले असतानाच ऐन दिवाळीच्या तोंडावर सीएनजी गॅस ४ ते ६ रुपयांनी महागण्याची दाट शक्यता आहे. केंद्र सरकारने गॅस वितरण कंपन्यांना देशातील स्वस्त नैसर्गिक गॅसचा पुरवठा कमी केला आहे. त्यामुळे दिवाळीत महागाईचा भडका उडणार आहे.

अरबी समुद्रापासून बंगालच्या उपसागरापर्यंत नैसर्गिक वायूचा पुरवठा जमिनीखालून आणि समुद्रतळातून भारताला केला जातो. हा नैसर्गिक वायू कच्चा माल आहे. याचे रुपांतर सीएनजी व पीएनजीमध्ये केले जाते. हा गॅस वितरण कंपन्यांना पाठवला जातो.

हा पुरवठा दरवर्षी ५ टक्क्यांनी कमी होत आहे. घरगुती एलपीजीचा पुरवठा स्थिर आहे, त्यामुळे त्यात वाढ होण्याची शक्यता नाही. परंतु, पुरवठादारांकडून कमी गॅसचा पुरवठा होत असल्याने वितरण कंपन्यांना महागडा सीएनजी घ्यावा लागत आहे. त्यामुळेच आगामी काळात सीएनजीचे दर वाढण्याची शक्यता आहे. मे २०२३ मध्ये सीएनजीची ९० टक्के मागणी ही जुन्या गॅस क्षेत्रातून होत होती. आता त्यातून पुरवठा सातत्याने घटत आहे. १६ ऑक्टोबरपासून सीएनजीच्या मागणीच्या ५० टक्के कमी पुरवठा होत आहे. गेल्या महिन्यात हाच पुरवठा ६७.७४ टक्के होता. त्यामुळे देशातील गॅस वितरण कंपन्यांना सीएनजीचा पुरवठा करण्यासाठी महागडा एलएनजी विकत घ्यावा लागत आहे. त्यामुळे सीएनजीच्या दरात ४ ते ६ रुपये प्रति किलो वाढ होण्याची शक्यता आहे. जुन्या गॅस क्षेत्रातून मिळणाऱ्या नैसर्गिक वायूचा दर ६.५० यूएस डॉलर्स आहे, तर आयात केल्या जाणाऱ्या एलएनजीचा दर ११-१२ डॉलर आहे.

सरकार उत्पादन शुल्कात कपात करण्याची शक्यता

महाराष्ट्र, झारखंडमध्ये सध्या विधानसभेची निवडणूक असून लवकरच दिल्लीतील निवडणुकीची शक्यता आहे. त्यामुळे सीएनजीच्या दरात कपात करण्यासाठी सरकार सीएनजीच्या उत्पादन शुल्कात कपात करू शकते. सीएनजीची दरवाढ झाल्यास मतदार नाराज होऊ शकतात. त्यामुळे सरकार उत्पादन शुल्क घटवू शकते.

logo
marathi.freepressjournal.in