कोचिंग सेंटर्स बनली आहेत मृत्यूचे सापळे; सुप्रीम कोर्टाचे ताशेरे, "आम्ही ही कोचिंग केंद्रे बंद करण्याचे आदेशही देऊ शकतो"

कोचिंग सेंटर्स मृत्यूचे सापळे बनले असून विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ करीत असल्याचे खडसावत सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी कोचिंग सेंटरच्या तळघरात झालेल्या तीन विद्यार्थ्यांच्या मृत्यूची स्वत:हून नोंद घेत यासंदर्भात म्हणणे मांडण्यासठी केंद्र सरकार आणि दिल्ली सरकारला नोटिसा बजावल्या आहेत.
कोचिंग सेंटर्स बनली आहेत मृत्यूचे सापळे; सुप्रीम कोर्टाचे ताशेरे, "आम्ही ही कोचिंग केंद्रे बंद करण्याचे आदेशही देऊ शकतो"
संग्रहित छायाचित्र
Published on

नवी दिल्ली : कोचिंग सेंटर्स मृत्यूचे सापळे बनले असून विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ करीत असल्याचे खडसावत सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी कोचिंग सेंटरच्या तळघरात झालेल्या तीन विद्यार्थ्यांच्या मृत्यूची स्वत:हून नोंद घेत यासंदर्भात म्हणणे मांडण्यासठी केंद्र सरकार आणि दिल्ली सरकारला नोटिसा बजावल्या आहेत.

कोचिंग सेंटरच्या तळघरात बुडून नागरी सेवा परीक्षेला बसण्याची इच्छा असणाऱ्या तीन उमेदवारांचा मृत्यू झाला होता. राजधानीत अलीकडेच घडलेली ही दुर्घटना सर्वांच्याच डोळ्यात अंजन घालणारी आहे, असे न्या. सूर्य कान्त आणि न्या. उज्ज्वल भूयान यांच्या पीठाने म्हटले आहे.

सुरक्षिततेच्या आणि अन्य मूलभूत निकषांचे संपूर्ण पालन होत नाही तोपर्यंत कोचिंग संस्था ऑनलाईन कारभार करू शकतात. देशाच्या विविध भागातून येणाऱ्या इच्छुक उमेदवारांच्या आयुष्याशी कोचिंग सेंटर्स खेळत आहेत, असे पीठाने म्हटले आहे.

राऊज आयएएस स्टडी सर्कलमध्ये तीन उमेदवारांचा मृत्यू झाला, त्याचा तपास दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी शहर पोलिसांकडून सीबीआयकडे वर्ग केला. तपासाबद्दल जनतेच्या मानत संशय राहू नये यासाठी उच्च न्यायालयाने हे आदेश दिले. राऊज आयएएस स्टडी सर्कलचे सीईओ अभिषेक गुप्ता आणि समन्वयक देशपाल सिंह यांच्यासह सात जणांना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

कोचिंग सेंटरच्या तळघरात बुडाल्याने श्रेया यादव (२५, उत्तर प्रदेश), तान्या सोनी (२५, तेलंगणा) आणि नेव्हीन डेल्विन (२४, केरळ) या तिघांचा मृत्यू झाला होता.

आम्ही ही कोचिंग केंद्रे बंद करण्याचे आदेशही देऊ शकतो

आमच्या वाचनात जे आले ते भयावह आहे. गरज भासल्यास आम्ही ही कोचिंग केंद्रे बंद करण्याचे आदेशही देऊ शकतो. सध्या कोचिंग केंद्रे ऑनलाईन सुरू ठेवा, असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

logo
marathi.freepressjournal.in